Mahadev Jankar : एनडीएसोबत आम्ही युती केली ही आमची चूक; महादेव जानकरांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : एनडीएसोबत आम्ही युती केली ही आमची चूक होती, असे विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केले आहे. या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना महादेव जानकर यांनी हे विधान केले आहे.
यावेळी बोलताना जानकर यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच कॉंग्रेससोबत युती करण्याचे संकेतही त्यांनी त्यांच्या भाषणातून दिले आहेत. या कार्यक्रमाला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते. त्यांना उद्देशून बोलताना जानकर म्हणाले, जयंती तो बहाना हें, दिल्ली में सरकार लाना हें, असे म्हणत त्यांनी विरोधकांना इशाराच दिला आहे. यावेळी राहुल गांधी, शरद पवार येणार होते परंतु आले नाहीत, यावर त्यांनी खंत देखील व्यक्त केली आहे.
पुढे जानकर म्हणाले, ज्या दिवशी केंद्रातील सरकार दिल्लीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करेल त्या दिवशी मी अमेरिकेत जयंती साजरी करेल. अहिल्याबाई होळकर यांची जयंती हे तर फक्त औचित्य आहे. खरे तर आम्हाला दिल्लीत सरकार आणायचे आहे. एक दिवस लाल किल्ल्यावरून आपले भाषण झाले पाहिजे हा माझा संकल्प आहे.
जानकर म्हणाले, निधन झाल्यावर माझा मृतदेह दिल्लीतच राहणार. राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा मृतदेह कराडला नेला होता. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा मृतदेह त्यांच्या गावी नेला होता. पण माझी बॉडी दिल्लीतच राहणार हा माझा शब्द आहे.





