प्रभात वृत्तसेवा इंदापूर – इंदापूर नगरपरिषद निवडणुकीने तालुक्यातील राजकीय वातावरणाला अक्षरशः उकळी आणली आहे. यंदाची निवडणूक केवळ उमेदवारांची नसून, दोन भिन्न राजकीय शक्तींच्या वैचारिक, संघटनात्मक आणि प्रतिष्ठेच्या आमनेसामने झुंजीची बनली आहे.एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादीचा त्याग करून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजप नेते प्रवीण माने यांना एकत्र आणत ‘कृष्णा-भीमा विकास आघाडी’ हा अनपेक्षित आणि प्रभावी राजकीय प्रयोग उभा केला आहे. या तिघांच्या एका मंचावर येण्याने इंदापूरच्या राजकारणाचा नकाशाच बदलू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.तर दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी, इंदापूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे. शहरात विकासाच्या बळावर भरणे यांनी भरत शहा यांना उमेदवारी देत या लढतीला ‘मेगा पॉवर’ मिळवून दिला आहे. शहा परिवारातील अंकिता मुकुंद शहा यांचे काम, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची राजकीय चाणाक्षता आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दमदार प्रचार यामुळे या बाजूची ताकदही भक्कम बनली आहे.शहरात सध्या विकास विरूद्ध नवी समीकरणे अशी थेट लढत होण्याचे चित्र असून, सभा, रॅली, सोशल मीडिया मोहिम आणि घराघरातील संवादामुळे वातावरण तापले आहे. या निवडणुकीचा निकाल केवळ नगरपरिषदेवर कोणाचा झेंडा फडकतो हेच नाही, तर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय वर्चस्व कोणाचे असणार? याचा वेध घेणारी ठरणार आहे. इंदापूरचा हुकूम कोणाच्या हातात जाणार? याचा निर्णय मात्र मतदारांच्या बोटावर अवलंबून असणार आहे. विकास विरूद्ध समीकरण? इंदापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकासाचा दमदार दावा केला आहे, तर शहरात कोट्यवधींच्या कामांचा पाऊस, पडल्याने विकास कामे सुरू आहेत. शांत संयमी आणि कामाचे म्हणून सर्व परिचित असणारे कर्मयोगी शंकराव पाटील साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन भरत शहा यांची उमेदवारी कृषिमंत्री भरणेंचा मास्टर स्ट्रोक’ समजला जात आहे. या निवडणुकीत नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष अंकिता शहांचे पूर्वीचे काम मजबूत आधार देणारे आहे.तर जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची संघटनात्मक पकड या निवडणूकीत विकास, निधी आणि संघटनशक्तीचा त्रिकोण तयार करणार आहे. कृष्णा–भीमाचा राजकीय स्फोट? प्रदीप गारटकरांचा राष्ट्रवादीला रामराम व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच भाजप नेते प्रवीण माने एकाच मंचावर ही विळा – भोपळा नात्याची पुन्हा झालेली राजकीय एकजूट, नव्या उमेदवारांना संधी देणारे पॅनल, भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) घटक एकत्र, यामुळे इंदापूरच्या राजकारणाला मिळालेले नवे समीकरण, कृष्णा–भीमा आघाडीला संघटनाच्या रुपाने राजकीय गणिताचा त्रिवेणी संगम झालेला दिसत आहे.