सातारा – दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की महाराष्ट्राचे मिनी काश्मीर अर्थात महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटन स्थळाला पर्यटकांची भेट देण्यासाठी अक्षरशः चढाओढ लागते. दरवर्षी राज्याचे राज्यपाल ही शासकीय दौऱ्यानुसार पाच दिवस सातारा जिल्ह्यातील या थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वरच्या राजभवन येथे येऊन या उन्हाळी पर्यटनाचा आनंद लुटतात. यावर्षी देखील महाबळेश्वर, पाचगणीसह लगतच्या तापोळा, बामणोली, वाई, कास या पर्यटन स्थळावर ही पर्यटकांची विशेष गर्दी होऊ लागली आहे. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत वाढत्या उन्हाचा चटका पर्यटकांना बसू नये यासाठी पालिका आणि परिसरातील व्यापारी बंधूंनी पर्यटकांना सावलीतून ये-जा करावी यासाठी हिरव्या शेडनेटचा आच्छादनच संपूर्ण बाजारपेठेवर घातल्याचे दिसून येत आहे. यामध्ये लालचुटूक स्ट्रॉबेरी, मलबेरी, गुजबेरी, छोटी छोटी करवंदे जांभळे, आळवं ,कोकम, तोरण यासारख्या रानमेवा ही सध्या या परिसरात परिसरातील ग्रामस्थ विक्रीसाठी घेऊन येत आहेत. याचप्रमाणे गुलाबी मुळे, लाल चुटूक गाजरे यांचे थेलेही या ठिकाणी पाहायला मिळत आहेत . पर्यटन म्हणाले की आनंदाला उधाणच येते. त्यामुळे या साबणे रोडवर मुख्य बाजारपेठ परिसरात मस्त धुंद वातावरणात थंड हवेत, खरेदी करत आणि महाबळेश्वरी चणे फुटाणेचा आस्वाद घेत या परिसरातील पर्यटक रात्री उशिरापर्यंत फिरताना दिसून येत आहेत. तसेच या मार्गावर असलेले पाणीपुरी, भेळपुरी आणि बर्फाचा गोळा, गरमागरम मक्याच्या कणसाचे विविध प्रकार स्ट्रॉबेरी टॉपिंग, स्ट्रॉबेरी क्रीम विथ आईस्क्रीमची चव अनुभवण्यासाठीही पर्यटक येथे गर्दी करत आहेत. महाबळेश्वराच्या स्थानिक बाजारपेठेत बनवलेले कंगवे, फणी, त्याचप्रमाणे कोल्हापुरी चपला,लाकडी काठ्या खरेदीसाठी ही गर्दी होताना दिसते. या बाजारपेठेत अनेक नामवंत कंपन्यांच्या उलन स्वेटर, टोप्या, मफलर्स ,रग, रजया, बेडशीट, उशीचे तसेच तक्क्यांचे कव्हर्स खरेदीसाठीही पर्यटक गर्दी करतात. दुपारच्या वेळेस परिसरातील 12 स्थानिक पर्यटन स्थळ पॉईंट आणि दोन ऐतिहासिक शिवमंदिरे आणि पंचगंगा मंदिराला भेट देऊन सायंकाळच्या वेळी वेण्णा लेक येथील नौका विहाराचा आनंद पर्यटक घेत आहेत. याच ठिकाणी असणारी घोडे स्वारी व विविध प्रकारच्या मनोरंज खेळाचा आनंद लुटून वेण्णा लेक परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी उद्यानात फोटोग्राफीसाठी आपला काही क्षण घालवत आहेत. तीन दिवसांची ही मनमुराद आनंद देणारी ट्रीप एन्जॉय करताना पर्यटक लगतच्या पाचगणी येथील टेबल लँड , पार्शी पॉईंट ,गुहा हा नजारा अनुभवून तापोळा येथे शिवसागर जलाशयात नौका विहार करतात बामणोली तसेच परिसरातील निसर्गरम्य अशा परिसराचा आनंद लुटतात आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात.