प्रभात वृत्तसेवा महाबळेश्वर – महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिका हद्दीमधील विविध विकास कामांसाठी नगर विकास विभागामार्फत मान्यता मिळाली असून केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य २०२५- २६ या योजनेअंतर्गत या कामांसाठी ६४ कोटी ६५ लाख २४ हजार ६१६ रुपये इतक्या निधीला मंजुरी मिळाली आहे. तर नगरपालिकेच्या इमारतीबरोबरच अंतर्गत रस्त्यांचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली. या निधीमधून बरेच वर्षापासून रेंगाळलेली महाबळेश्वर नगरपालिकेची प्रशासकीय इमारत नव्याने उभी राहणार आहे. नगरपालिका हद्दीतील तापोळा रस्ता ते ससून रस्ता, जन्नीमाता सोसायटी व जुना सातारा रस्ता काँक्रीटीकरण करून रस्त्याच्या बाजूने पावसाळी गटारांची सुविधा निर्माण केली जाणार आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून तापोळ्याला जाणाऱ्या नगरपालिका हद्दीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे तर या रस्त्यालगत असणाऱ्या ग्लेन ओगल धरणावरील पूल धोकादायक झाला होता. विसर्जन विहिरीनजीकच्या खचलेल्या रस्त्यामुळे परिस्थिती गंभीर होत होती. या रस्त्याचे काँक्रिटीकरण करून ग्लेन ओगल धरणावरील पूल नव्याने बांधल्यावर येथील वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे. या बरोबरच आर. आर. हेरिटेज रिसॉर्ट कॉर्नर ते ग्लेनगिरी बंगलो ते लॉडविक पॉईंट रस्त्यापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणाचाही या योजनेत समावेश आहे. यावेळी नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक संजय जंगम, नासिर मुलाणी, संतोष शिंदे, राहुल पिसाळ, अफझल सुतार, रोहित ढेबे, रवींद्र कुंभारदरे, संतोष आखाडे तसेच नगरसेविका विमलताई पार्टे, विद्या बावळेकर, संगीता वाडकर, प्रियंका वायदंडे, रेश्मा ढेबे उपस्थित होत्या. “उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या सहकार्यामुळे व प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे महाबळेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. महाबळेश्वर शहरातील नागरिकांच्यावतीने आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्यावतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो.” – सुनील शिंदे ( लोकनियुक्त नगराध्यक्ष, महाबळेश्वर)