महाबळेश्वर पालिकेचा शंभर खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव

आराखड्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा विचार
महाबळेश्वर (प्रतिनिधी) – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर पालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून महाबळेश्वर व पाचगणी या शहरांसाठी शंभर खाटांच्या रुग्णालयाचा आराखडा तयार केला आहे. या रुग्णालयात करोनाबाधितांवर उपचार होऊ शकतील, या दृष्टीने हा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासंदर्भात पालिका प्रशासन गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दिली.
यावेळी नगरसेवक कुमार शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्रात करोना विषाणूचा फैलाव होत असून सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण पुण्यात आढळले आहेत. पुणे शहर महाबळेश्वरपासून केवळ 120 किमी अंतरावर आहे. तेथील काही बाधित रुग्ण महाबळेश्वर व पाचगणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतापासूनच खबरदारी घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला दिली आहे. करोना संसर्ग पुढील टप्प्यात पोहोचल्यास धावपळ नको म्हणून शंभर खाटांच्या रुग्णालयाची सोय होईल, अशी जागा शोधण्यात आली आहे. तेथे बाधित रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्याचे प्रस्तावित असून एकदा भरती झाल्यावर रुग्णांना बाहेर पडता येणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल. त्यासाठी बेल ऐअर रुग्णालय व्यवस्थापनाची मदत होणार आहे.
पहिल्या टप्प्यात डालकेट येथील त्यांच्या अतिदक्षता विभागात चार खाटांची सोय करण्यात येणार आहे. त्यानंतर 20 ते 25 जणांची सोय कशी करता येईल, याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. अंतिम टप्प्यात शंभर खाटांची सोय असलेले ठिकाण विनाविलंब विकसित करण्यात येणार असून त्या ठिकाणी रुग्णांना आवश्यक सुविधा मिळतील, याची दक्षता घेण्यात येईल. तशी वेळ आल्यास शहरातील लोकांना घरातुन बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी सांगितले।
दरम्यान, पुण्याहून महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सध्या शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट असला तरी बाजारपेठ पूर्वीप्रमाणे सुरू आहे. शहर व परीसरातील लॉज, हॉटेल सुरू असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व पॉइंटस्, धार्मिक स्थळे, किल्ले पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी येथे आलेल्या पर्यटकांची राहण्याची, खाण्यापिण्याची कोणतीही गैरसोय होताना दिसत नाही.





