पाचगणी – राज्य शासनाने घेतलेल्या शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत 2022 या वर्षासाठी महाबळेश्वर गिरीस्थान पालिकेने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. नगरविकास दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईतील मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात दहा कोटी रुपयांचे पारितोषिक मुख्याधिकारी पल्लवी पाटील व सहकाऱ्यांनी स्वीकारले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी उपस्थित होत्या. या पारितोषिकाने महाबळेश्वरच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. शहर स्वच्छतेसाठी मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केलेल्या कामाची दखल घेतल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महाबळेश्वरला निसर्गाचे वरदान लाभले आहे. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या महाबळेश्वरमध्ये कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पल्लवी पाटील नेहमीच आग्रही राहिल्या.
पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ नये आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेची चळवळ निर्माण करुन, कचरा कमी होण्यासाठी पल्लवी पाटील यांनी काम केले. महाबळेश्वरमध्ये प्लॅस्टिकचे उच्चाटन करत पर्यावरण समृद्ध ठेवण्यासाठी पल्लवी पाटील यांनी आरखडा राबवला. त्यामुळे पालिकेला राज्यात दुसरे बक्षीस मिळाले आहे. दरम्यान, सर्व नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे प्रशासनाला हे यश मिळवता आले, अशी भावना पल्लवी पाटील यांनी व्यक्त केली आहे.