satara | महाबळेश्वर शहर मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त

महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – महाबळेश्वर शहर मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्त झाले असून सध्या सुमारे ३५० पेक्षा जास्त श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले असल्याची महिती जेनीस ट्रस्टचे सेक्रेटरी संचालक प्रबोध गायकवाड, ऋतिका गायकवाड यांनी दिली. प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटलांच्या या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळाने शहरातून त्यांचे कौतुक होत आहे.
महाबळेश्वर शहरातील अनेक परिसरात मोकाट कुत्र्यांच्या वावरामुळे सर्वत्र भितीदायक वातावरण निर्माण झाले होते. सकाळी विद्यार्थी शाळेत किंवा प्रवासी एस.टी स्टॅण्डवर जात असताना चौकाचौकात मोकाट कुत्र्यांच्या टोळ्यांमुळे त्यांची दहशत होती. पहाटेच्या वेळेला फिरायला जाणाऱ्यांना देखील बाहेर पडताना भिती वाटत होती.
अनेकवेळा वर्तमान पत्रांमधून देखील याबाबत आवाज उठवण्यात आला होता. नेमके याचवेळी नवीन प्रशासक तथा मुख्याधिकारी म्हणून योगेश पाटील यांची नियुक्ती झाली होती. महाबळेश्वरमध्ये आल्या आल्या त्यांना मोकाट कुत्र्यांच्या त्रासाच्या बातम्या वाचायला मिळाल्या व त्यांनी त्वरीत या बातम्यांची दखल घेत कुत्र्यांच्या त्रासापासून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजनांसाठी प्रयत्न सुरू केले.
पाचगणी येथील जेनीस स्मिथ ॲनिमल वेल्फेअर ट्रस्टच्या कार्याबाबत त्यांना माहिती मिळाली. या ट्रस्टने महाबळेश्वर, पाचगणी व वाई परिसरातील अनेक प्राण्यांना जीवदान दिले आहे. तसेच गरजू प्राण्यांना आश्रय देत जखमी असलेल्या प्राण्यांना जागेवर जाऊन त्यांची शुश्रुषा करत मोठे कार्य करीत आहे.
या ट्रस्टच्या कामाची माहिती घेत महाबळेश्वर शहरातील नगरपालिका हद्दीतील मोकाट कुत्र्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रशासक पाटील यांनी प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच महाबळेश्वर मधील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरणाची मोहिम हाती घेतली. त्याला चांगले यश आले आहे.





