तिढा सुटला; महाविकास आघाडीतर्फे उर्वरित ३ उमेदवारांचे अर्ज दाखल  

मुंबई – राज्यसभेच्या ५५ जागांसाठी देशभरातील १७ राज्यांमध्ये येत्या २६ मार्च रोजी निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील राज्यसभेच्या ७ खासदारांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात पूर्ण होत असल्याने या जागांसाठी देखील निवडणूक लागली आहे. दरम्यान, राज्याच्या विधानसभेतील संख्याबळानुसार सत्ताधारी महा विकास आघाडीला ४ तर विरोध पक्ष भाजपला ३ जागा मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.

महाविकास आघाडीतर्फे आज आपल्या चारही उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक २ जागा आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीतर्फे आपला उमेदवारी अर्ज यापूर्वीच दाखल केला होता. अशातच आज महाविकास आघाडीच्या उर्वरित ३ उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले असून यात काँग्रेस सरचिटणीस राजीव सातव, शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फौजिया खान यांचा समावेश आहे.

भाजपकडूनही उमेदवारांची यादी जाहीर; खडसेंना डावलले

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांची राज्यसभेवर वर्णी लागू शकते असे कयास बांधले जात होते मात्र भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर पक्षाने खडसेंना पुन्हा एकदा डावलल्याचे स्पष्ट झाले. भाजपतर्फे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर खासदारकीचा राजीनामा देत पक्षप्रवेश केलेले उदयनराजे भोसले, मित्रपक्ष रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले व औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड (who is bhagwat karad) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अशी पार पडते राज्यसभेची निवडणूक…

जनतेतून विधानसभेवर निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जाण्यासाठी उमेदवारास किती मतं आवश्यक आहेत यासाठी एक सूत्र आखण्यात आले आहे. या सूत्रानुसार राज्यातील एकूण विधानसभा सदस्य संख्येला राज्यातील रिक्त राज्यसभा खासदार संख्या अधिक एकने भागले जाते. आलेल्या संख्येत एकची बेरीज करून उमेदवारास विजयासाठी ‘तेवढी’ मतं मिळवणं आवश्यक असल्याचं मानलं जातं. महाराष्ट्रामध्ये विधानसभा सदस्य संख्या २८८ असून राज्यसभेच्या एकूण ७ जागा रिक्त आहेत. यामुळं सूत्रानुसार (२८८/८ = ३६ व ३६ + १ = ३७) राज्यसभेवर निवडून जायचे असल्यास ३७ आमदारांचे प्रथम पसंतीचे मत मिळणं आवश्यक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.