सातारा – साथरोग नियंत्रणासाठी महास्वच्छता अभियान उपयुक्त ठरेल

सातारा – सध्या पावसाळा सुरु असून पावसाचे पाणी साठल्याने त्याठिकाणी साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे डासांची उत्पत्ती होणाऱ्या स्थळांचा नायनाट केला पाहिजे. आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच सार्वजनिक ठिकाणची डबकी तसेच प्लास्टिक कचरा यांचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. साथरोग नियंत्रणासाठी महास्वच्छता अभियान उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले.
कुडाळ (ता. जावळी) येथे साथ रोग नियंत्रण मोहिमे अंतर्गत महास्वच्छता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी श्रीमती नागराजन बोलत होत्या.
महास्वच्छता अभियानांतर्गत कुडाळ येथे महास्वच्छता अभियानात श्रीमती नागराजन सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पिंपळबन, प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली. जि. प. प्राथमिक शाळेत जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व हात धुण्याचे महत्व समजावून सांगितले. जि. प.शाळेत आंबा, चिकु इत्यादी फळझाडांचे वृक्षारोपन त्यांनी केले.
शाळा व आंगणवाडीतील पिण्याचे पाणी निर्जंतुक आहे का हे ओटी टेस्टव्दारे तपासणी करुन श्रीमती नागराजन यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी गृह भेटीद्वारे जनतेशी थेट संपर्क साधून घराचा परिसर स्वच्छ ठेवन्याचे आवाहन केले. पावसाळ्यातील जलजन्य व साथरोग आजार टाळन्यासाठी दर शनिवारी जिल्हयातील सर्व गावांमध्ये महास्वच्छता अभियान राबवन्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कचऱ्याचे वर्गीकरण करुन प्लास्टिकचा वापर कमी करावा, अशा सुचना त्यांनी दिल्या. गृहभेटी दरम्यान उघड्यावर पाणी साठवले जात असलेली भांडी तसेच टायर यासारख्या वस्तू नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतः प्रयत्न केला.जिल्ह्यातून डेंगुचे व साथरोगाचे नियंत्रण आणणे, दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळन्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे , गटविकास अधिकारी मनोज भोसले , गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, सरपंच सुरेखा कुंभार.उपसरपंच सोमनाथ कदम. ग्रा. प. सदस्य विरेंद्र शिंदे. जगन्नाथ कचरे, धैर्यशील शिंदे, जिल्हा तज्ञ अजय राऊत, विस्तार अधिकारी श्री. सुरवसे, श्री.पवेकर.बीआरसी संतोष जाधवझ रमेश शिंद , रुचा परामणे, ग्रामसेवक रजनिकांत गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हयात १४९३ ग्रामपंचायतीत अभियान- संतोष हराळे
जिल्ह्यातील १४९३ग्रामपंचायतीत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. घरांच्या शेजारी ,सार्वजनिक ठिकाणी, व्यावसायीकांकडे असणारे अनावश्यक साहित्य यामध्ये गाड्याचे टायर, झाडांच्या कुड्या.रिकाम्या रंगाच्या बादल्या.रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या. माठ. तुटक्या वस्तू आदींची यावेळी विल्हेवाट लावन्यात आली.जलजन्य व साथरोग आजार व नियंत्रणाबाबत गृहभेटी देऊन जनजागृती करन्यात आली. महास्वच्छता अभियानात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेतला असून यामुळे साथरोग नियंत्रण होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे यांनी व्यक्त केली.





