मदुराई – चीन येथे उगम पावलेला कोरोना विषाणू सध्या सर्वांच्याच आयुष्यात ‘व्हिलन’ची भूमिका निभावतोय. अत्यंत संसर्गजन्य असलेल्या या कोरोना विषाणूची बाधा आतापर्यंत १ कोटीहून अधिक लोकांना झाली असून लाखो कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचे शुक्लकाष्ट आपल्या मागे लागू नये यासाठी बरेच लोक सध्या आवश्यक ती खबरदारी घेत आहेत तर काही जण अद्यापही बेफिकीरपणे वागून आपला व आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत आहेत.
एक गोष्ट मात्र नक्की, कोरोनाला हलक्यात घेणार असो वा सिरियसली सर्वांसाठीच कोरोनापूर्वीचे व कोरोनासोबत असतानाचे जग बदलले आहे. याचं साधं उदाहरण म्हणजे चहाची टपरी! एरवी चहा टपऱ्यांवर काचेच्या ग्लासातच चहा हवा असा अट्टहास करणारे आता कोरोनाच्या भीतीने निमूटपणे कागदी कपात चहा पिताना दिसतात.
आता असा कागदी कपांमधला चहा पिल्याने कोरोनाची भीती थोडी कमी होणार असली तरी या कागदी कपांच्या ढिगांचं करायचं तरी काय? असा प्रश्न स्वछताकर्मीना नक्की सतावत असेल. शिवाय दुकानापुढे पडलेला कागदी कपांचा खच पाहून चहावाल्याच्या कपाळावरही आठ्या उमटत असतीलच. मात्र यावर आता मदुराई येथील एका चहा व्यावसायिकाने चांगलाच उपाय शोधला आहे.
मदुराईतील या चहाविक्रेत्याकडे चहासाठी दिले जाणारे कप हे चक्क खाण्यायोग्य आहेत! येथे चहा २० रुपये प्रतिकप दराने मिळत असून चहा पिल्यानंतर तुम्ही हा कप चक्क खाऊ शकता. या कपाची चव तुम्हाला चहामध्ये बिस्कीट बुडवून खाल्ल्याप्रमाणेच लागेल.
या चहाविक्रेत्याचं नाव विवेक सबापथी असं असून ते दररोज ५०० कप चहाची विक्री करतात. त्यांनी चहासाठी दिल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक अथवा कागदी कपाला पर्याय शोधण्याची मोहीम गतवर्षी हाती घेतली होती. अखेर त्यांच्या या शोधास खाण्याजोग्या कपाचे फलित मिळाले.
आपल्या ग्राहकांना चहा देण्यासाठी सबापथी आता खाण्यायोग्य असलेला कप देत असून यामुळे सोशल डिस्टंसिंगचे नियम तर पाळले जात आहेतच शिवाय प्लॅस्टिकच्या वापरास ही अटकाव झाला आहे.
विवेक सबापथी यांनी शोधलेला हा नाविन्यपूर्ण मार्ग आपल्यास आवडल्यास त्यांची ही कहाणी इतरांसोबत नक्की शेअर करा!