कुणाल कामराला मोठा दिलासा, मद्रास उच्च न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

Kunal Kamra | स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार केल्याने वादात अडकला आहे. या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता मद्रास उच्च न्यायालयाने कुणालला मोठा दिलासा देत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला दिलासा देत 7 एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीम मंजूर केला आहे. त्यामुळे त्याला 7 एप्रिलपर्यंत अटक करता येणार नाही. मुंबईत आल्यास आपल्या जीवाला धोका निर्माण होईल. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे, असा दावा करत कुणालने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांकडून चौकशीसाठी नोटीस देखील बजावण्यात आली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता लक्षात घेत त्याने न्यायालयात धाव घेतली होती.
दरम्यान, कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार केल्याने वाद निर्माण झाला होता. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामराने ज्या ठिकाणी कार्यक्रम सादर केला त्या मुंबईतील खारमधील स्टुडिओची तोडफोड केल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणात राजकीय नेत्यांकडून देखील तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत.





