Madras High Court : पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असणे हा पत्नीवर अत्याचार ठरत नाही – मद्रास उच्च न्यायालय
पतीचे इतर महिलेसोबत अनैतिक संबंध असणे हे विवाहित पत्नीच्या बाबतीत क्रूरता मानले जाऊ शकत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) केली आहे.

Madras High Court : पतीचे इतर महिलेसोबत अनैतिक संबंध असणे हे विवाहित पत्नीच्या बाबतीत क्रूरता मानले जाऊ शकत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) केली आहे. न्यायमूर्ती सुंदर मोहन यांनी स्पष्ट केले की, गुन्हा सिद्ध करण्यासाठी केवळ अनैतिक संबंध असल्याचा संशय किंवा आरोप पुरेसा नसून, अभियोजन पक्षाला (पोलिसांना) त्याव्यतिरिक्त इतर ठोस पुरावे देखील सिद्ध करावे लागतील.
न्यायालयाने (Madras High Court) आपल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या पिनाकिन महीपतराव रावल विरुद्ध गुजरात राज्य या खटल्याचा संदर्भ दिला. याआधीच्या एका खटल्यातील निर्णयाचा हवाला देत उच्च न्यायालयाने मृत महिलेच्या भावाने दाखल केलेली अपील फेटाळून लावली. या प्रकरणात एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलासह आत्महत्या केली होती.
पतीचे अनैतिक संबंध आणि हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप होता. २३ एप्रिल २०१८ रोजी महिला न्यायालयाने पतीला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले होते. हुंड्याची मागणी आणि अनैतिक संबंधांचे आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे सादर न केल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला होता.
या निर्णयाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात (Madras High Court) अपील न केल्याने, मृत महिलेच्या भावाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले की, ट्रायल कोर्टाचा हा युक्तिवाद योग्य होता की केवळ पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून तो पत्नीवर क्रूरता करत होता असे म्हणता येणार नाही. पुराव्यांच्या स्वतंत्र मूल्यांकनानंतर, अभियोजन पक्ष आपला गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले.






