MP Govt : महिलांसाठी चौहान सरकारची योजनांची बरसात; रक्षाबंधनाची भेट म्हणून केली ‘ही’ मोठी घोषणाा…

भोपाळ :- भोपाळच्या जांबोरी मैदानावर रविवारी झालेल्या लाडली बहिणींच्या संमेलनात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निवडणुकीच्या वर्षात बहिणींना रक्षाबंधनाची भेट दिली. रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी महिलांच्या बॅंक खात्यात 250 रुपये जमा केले जाणार आहेत. तसेच ऑक्टोबरपासून, “लाडली बहन’च्या खात्यात दरमहा 1,250 रुपये जमा केले जातील.
श्रावण महिन्यात सरकार बहिणींना 450 रुपयांत गॅस सिलिंडर देणार आहे. तर दुसरीकडे जिथे 50 टक्के महिलांनी व्यसनाधीनता रोखण्यासाठी दारू दुकान बंद करण्याचे मान्य केले आहे, तिथे पुढील वर्षीपासून दारूचे दुकान बंद होणार आहे.
महिलांसाठी घोषणा करताना चौहान म्हणाले की, सध्या पोलीस भरतीत महिलांसाठी 30 टक्के आरक्षण आहे. आता महिलांना पोलीस आणि इतर सरकारी भरतीत 50 टक्के आरक्षण मिळणार आहे. याशिवाय नामनिर्देशित पदांवरही आता 35 टक्के महिलांची नियुक्ती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
प्रत्येक महिलेचे उत्पन्न 10,000 रुपये प्रति महिना वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. बचत गटातील अनेक महिला 10,000 रुपये कमावत आहेत. त्यामुळे आज लाडली बहना आजिविका मिशन अंतर्गत येणार हे निश्चित होत आहे. त्यांना स्वयंरोजगारासाठी बॅंक कर्ज देणार आहे. त्यासाठी अवघे 2 टक्के व्याज द्यावे लागेल. उर्वरित व्याजाची रक्कम सरकार भरणार आहे. तसेच भगिनींच्या नावावर कोणतीही मालमत्ता खरेदी केल्यास केवळ एक टक्का स्टॅंप फी आकारली जाईल.
बहिणीला छोटा उद्योग उभारायचा असेल तर आम्ही तिला पूर्ण मदत करू. औद्योगिक क्षेत्रातही भूखंड आरक्षित करण्यात येणार आहेत.
बेघर महिलांना घरे, थकीत वीजबील वसुलीला स्थगिती, भगिनींसाठी फक्त 100 रुपये वीज बील, घरगुती गॅस सिलिंडर 450 रुपयांत देणे यासह “गाव की बेटी’, “प्रतिभा किरण योजना’, “आहार अनुदान योजना’ अशा अनेक योजनांची घोषणा चौहान यांनी केली.


