भोपाळ – गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारविरोधी भूमिका घेत चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला मध्य प्रदेश पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. कंगनाला चित्रिकरणात सहभागी होऊ न देण्याचा इशारा कॉंग्रेस नेत्यांनी दिल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यात सध्या कंगनाच्या धाकड या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. तशात प्रदेश कॉंग्रेसकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यामुळे चित्रिकरणावेळी गोंधळ होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे त्या राज्यातील भाजप सरकारने कंगनाला पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला. शेतकरी आंदोलनाविरोधात ट्विट केल्यामुळे कंगना कॉंग्रेसच्या निशाण्यावर आली आहे.
कंगनाने शेतकऱ्यांच्या अवमानाबद्दल त्यांची माफी मागावी, अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाविषयीचे कंगनाचे काही वादग्रस्त ट्विट अलिकडेच ट्विटरने डिलिट केले. त्यावरुनही मोठा वाद झाला होता.