प्रभात वृत्तसेवा विंझर – ऐतिहासिक मढेघाट परिसरात पर्यटनासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर मधमाशांनी अचानक भीषण हल्ला केला. हल्ल्यात एकूण ५६ जण जखमी झाले असून त्यापैकी सहाजणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने पुण्यात खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. प्राथमिक उपचारानंतर इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याजवळ मधमाशाच्या हल्ल्यात पर्यटक जखमी झाले होते. त्यानंतर ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.ही घटना रविवार (दि.४) रोजी सकाळी घडली. मढेघाट परिसरात १० ते १३ वयोगटातील ५६ विद्यार्थी, १० प्रशिक्षकांचा गट निसर्ग पर्यटनासाठी आला होता. दुपारी मधमाशांच्या मोहोळ उठल्याने त्यांनी ग्रुपवर हल्ला चढवला. त्यावेळी ग्रुपमध्ये विद्यार्थी, प्रशिक्षक हल्ल्याचा बचाव करण्यासाठी सैरावैरा पळत सुटले. मात्र, मधमाशाचा मोहोळ मोठा असल्याने यातील कोणाही सुटले नाहीत. वन विभाग, केळद येथील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत मदतीसाठी धाव घेतली. जखमींना सुरक्षितस्थळी हलवून रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवले. जखमींना पासली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने वेल्हा येथील ग्रामीण रुग्णालयात ३५ जणांवर प्राथमिक उपचार केले. यात १७ मुले, १४ मुली आणि ४ ज्येष्ठांचा समावेश आहे. ६ जणांना तातडीने पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. २ मुले, १ मुलगी, २ पुरुष, १ महिला अशा सहाजणांची प्रकृती चिंताजनक आहे. बचावकार्यात धायरी, खेड शिवापूर, वेल्हा येथील ‘१०८’ रुग्णवाहिकांनी कामगिरी बजावली. महावितरणचे कर्मचारी सक्रिय मावळ भागातील ‘१८ गाव मावळ आपले महावितरण’ या व्हॉट्सॲप ग्रुपने मदतीसाठी मोठी भूमिका बजावली. कर्मचारी सूर्यकांत नारायण शिंदे यांनी ग्रुपवर मदतीचे आवाहन केले. आवाहनाला प्रतिसाद देत अनेक ग्रामस्थ गाड्या घेऊन घटनास्थळी पोहोचले. जखमींना वेल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केल्याने वेळेत जखमींवर उपचार केले.