Ramya Krishnan: १४ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण; अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत गाजली जोडी, ‘बाहुबली’ने दिली नवी ओळख
Ramya Krishnan दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चांगले काम केल्यानंतर राम्या यांनी बॉलिवूडकडेही मोर्चा वळवला. १९८८ मध्ये ‘दयावान’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

Ramya Krishnan: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री राम्या कृष्णन यांचा आज, १५ सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटातील राजमाता शिवगामी या भूमिकेमुळे राम्या कृष्णन यांना देशभरात विशेष ओळख मिळाली. मात्र, शिवगामीची भूमिका मिळण्याआधीच त्यांनी अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम केले होते. विशेष म्हणजे त्यांनी अवघ्या १४ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते.
राम्या कृष्णन यांचा जन्म १५ सप्टेंबर १९७० रोजी चेन्नई येथे झाला. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी १९८४ मध्ये आलेल्या ‘वेल्लई मनासु’ या तमिळ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी तमिळसोबतच तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्येही काम केले. १९८६ मध्ये आलेला ‘नीरम पुलारुमबोल’ हा त्यांचा पहिला मल्याळम चित्रपट होता. तर ‘भलाए मिथरुलु’ हा त्यांचा पहिला तेलुगू चित्रपट होता.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये चांगले काम केल्यानंतर राम्या यांनी बॉलिवूडकडेही मोर्चा वळवला. १९८८ मध्ये ‘दयावान’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. मात्र, या चित्रपटातून राम्या यांना फारशी ओळख मिळाली नाही.
यानंतर १९९३ मध्ये यश चोप्रा यांच्या ‘परंपरा’ या चित्रपटात त्या मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसल्या. या चित्रपटामुळे त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला वेग आला. त्यानंतर त्यांनी ‘खलनायक’, ‘चाहत’, ‘बनारसी बाबू’ आणि ‘बडे मियां छोटे मियां’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

Ramya Krishnan
राम्या कृष्णन यांनी बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले आहे. ‘चाहत’ या चित्रपटात त्यांनी शाहरुख खानसोबत काम केले. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. १९९७ मध्ये आलेल्या ‘शपथ’ चित्रपटात त्या जॅकी श्रॉफसोबत दिसल्या. तर १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बडे मियां छोटे मियां’मध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले. त्यामुळे राम्या यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील कारकीर्द चांगलीच चर्चेत राहिली.
मात्र, त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे ‘बाहुबली’. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या या चित्रपटात त्यांनी राजमाता शिवगामीची भूमिका साकारली. या भूमिकेत राम्या यांचा दमदार अभिनय, कठोर व्यक्तिमत्त्व आणि संवादफेक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. ‘बाहुबली’नंतर राम्या कृष्णन यांची ओळख केवळ दक्षिणेतील अभिनेत्री म्हणून राहिली नाही, तर संपूर्ण देशभरात त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली.
विशेष म्हणजे शिवगामीच्या भूमिकेसाठी सुरुवातीला अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर ही भूमिका राम्या कृष्णन यांच्याकडे आली आणि त्यांनी ती आपल्या अभिनयाने लक्षात राहील अशी केली.
राम्या कृष्णन यांनी आतापर्यंत २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी १२ जून २००३ रोजी तेलुगू चित्रपट दिग्दर्शक कृष्णा वामसी यांच्याशी लग्न केले. त्यांना ऋत्विक नावाचा मुलगा आहे.
आजही राम्या कृष्णन चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. आगामी काळात त्या अल्लू अर्जुनच्या ‘राका’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १४ व्या वर्षी सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. त्यामुळे राम्या कृष्णन यांची कारकीर्द ही नव्या कलाकारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.





