आत्मकेंद्रितपणामुळेच सचिनचे नेतृत्व अपयशी

मदनलाल यांनी केला खुलासा….
नवी दिल्ली – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एक खेळाडू म्हणून महान आहे यात शंका नाही. मात्र, तो केवळ स्वतःच्याच कामगिरीबाबत गंभीर होता, तसेच त्याच्या आत्मकेंद्रितपणामुळेच तो कधी कर्णधार म्हणून यशस्वी होऊ शकला नाही, अशा शब्दांत माजी कसोटीपटू व प्रशिक्षक मदनलाल यांनी सचिनच्या नेतृत्वातील अपयशाबद्दल खुलासा केला.
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 7 वर्षे उलटली आहेत. त्याच्याकडे जेव्हा संघाचे नेतृत्व होते तेव्हा त्याची वैयक्तिक कामगिरी देखील फार सरस होत नव्हती, त्याच्यावर कर्णधारपदाचे दडपण आहे हे स्पष्ट जाणवत होते. जेव्हा त्याच्याकडून महंमद अझरुद्दीनक़डे नेतृत्व आले त्यानंतर खुद्द सचिननेही पुन्हा कधीही नेतृत्व घेण्याची तयारी दर्शवली नाही. तो एक खेळाडू म्हणूनच संघात राहणे पसंत करत होता. त्याने प्रत्येक कर्णधाराला उत्तम सहकार्य केले. नवोदितांनाही सामावून घेतले पण तो स्वतः यशस्वी कर्णधार बनू शकला नाही, असेही मदनलाल यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने शतकांचे शतक साकार केले. एकदिवसीय सामन्यांत पहिल्यांदा द्विशतक फटकावणारा सचिन पहिलाच फलंदाज ठरला. सर्वाधिक धावाही त्याच्याच नावावर आहेत. तो जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाज आहे यात शंका नाही. मात्र, तो कर्णधार म्हणून यशस्वी ठरला नाही हे कोणीच नाकारणार नाही. तो स्वतः प्रत्येक सामन्यात 100 टक्के योगदान द्यायचा आणि हीच अपेक्षा तो संघातील सर्वांकडून करायचा. त्याचा दृष्टिकोन योग्य होता पण तसे घडत नव्हते मग तो निराश व्हायचा. प्रत्येक खेळाडूची क्षमता भिन्न असते हे त्याला मान्यच नव्हते. त्यामुळे अन्य कर्णधारांप्रमाणे त्याला नेतृत्व हाताळता आले नाही, असेही त्यांनी सागितले.
एक खेळाडू म्हणून तुम्ही स्वतःच्या कामगिरीबाबत आत्मकेंद्रित राहिला तर त्यात वावगे काहीच नसते. मात्र, जेव्हा तुम्ही कर्णधार असता त्यावेळी संघातील सर्व सहकारी खेळाडूंकडून त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून घेत संघाला यश मिळवून द्यायचे असते. हे सचिनला कधीही जमले नाही. सचिनने त्याच्या कारकिर्दीत 25 कसोटी व 73 एकदिवसीय लढतीत संघाचे नेतृत्व केले. मात्र, यशाची टक्केवारी पाहिली तर मी जे सांगत आहे ते सिद्ध होते, असेही मदनलाल म्हणाले.





