Maharashtra MLC Elections: शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज; 137 केंद्रांवर कडेकोट देखरेख
Maharashtra MLC Elections जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी 44 आणि पदवीधर मतदारसंघासाठी 93 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. शिक्षक मतदारसंघात 9 हजार 454 मतदार तर पदवीधर मतदारसंघात 47 हजार 463 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Maharashtra MLC Elections: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शुक्रवार, दि. 23 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, जिल्ह्यातील 137 मतदान केंद्रांवर विशेष देखरेख ठेवण्यात येणार आहे. मतदान प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, तसेच निवडणूक शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी सूक्ष्म निरीक्षक आणि स्थिर व्हिडीओग्राफीची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील आणि उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे उपस्थित होते.
शिक्षकांसाठी 44, पदवीधरांसाठी 93 केंद्रे
जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघासाठी 44 आणि पदवीधर मतदारसंघासाठी 93 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. शिक्षक मतदारसंघात 9 हजार 454 मतदार तर पदवीधर मतदारसंघात 47 हजार 463 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
685 अधिकारी-कर्मचार्यांची नियुक्ती
मतदानाची जबाबदारी पार पाडण्यासाठी शिक्षक मतदारसंघासाठी 220, तर पदवीधर मतदारसंघासाठी 465 अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत पर्यायी व्यवस्था म्हणून शिक्षक मतदारसंघासाठी 60 आणि पदवीधर मतदारसंघासाठी 100 राखीव कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहेत. मतदानासाठी शिक्षक मतदारसंघात 108, तर पदवीधर मतदारसंघात 385 मतपेट्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा, मतदार याद्या आणि मतदान साहित्य उपलब्ध करून देण्याचे नियोजनही पूर्ण करण्यात आले आहे.
मतदानापूर्वी नाव व केंद्र तपासण्याचे आवाहन
मतदानाच्या दिवशी होणारी गैरसोय टाळण्यासाठी शिक्षक आणि पदवीधर मतदारांनी मतदार यादीतील आपले नाव तसेच मतदान केंद्राची माहिती आधीच तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यासाठी मतदार नाव शोध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.





