Pimpri : ‘माण’चा राज्यस्तरीय पुरस्कारचा निर्धार

हिंजवडी : राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात” आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण ग्रामपंचायतीने हिरिरीने सहभाग नोंदवत राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्याचा निर्धार केला आहे. सरपंच अर्चना आढाव यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ, पदाधिकारी आणि प्रशासनाने मिळून राज्यात ठसा उमटवण्यासाठी कंबर कसली आहे.
ग्रामीण भागाचा सर्वांगीण, शाश्वत आणि समृद्ध विकास साधण्यासाठी ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार हे अभियान जिल्हा व तालुका स्तरावर प्रभावीपणे राबवले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या अभियानाची घोषणा केली होती. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर माण ग्रामपंचायतीत सरपंच अर्चना आढाव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी मदन शेलार यांनी अभियानाचे सात मुख्य घटक उलगडले. सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा अंमलबजावणी, लोकसहभाग आणि श्रमदानाद्वारे नावीन्यपूर्ण उपक्रम. त्यांनी ग्रामस्थांना सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहित केले.
यावेळी सरपंच अर्चना आढाव यांनी ग्रामस्थांना एकत्र येऊन राज्यस्तरीय पुरस्कार माणच्या नावावर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या शुभांगी भोसले, सुवर्णा भोईर, युवा नेते सचिन आढाव, माजी सदस्य नानासाहेब कोळी, महिला ग्रामसंधन गट, बचत गट सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीतर्फे विविध प्रशिक्षण घेत असलेल्या महिला व मुलींना प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे माण ग्रामपंचायत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सज्ज असल्याचे चित्र दिसून आले.





