M.K.Stalin : केंद्रीय एजन्सीजचा वापर करून खोट्या केसेसमध्ये आम आदमी पक्षाच्या नेत्यांना कसे अडकवले आणि त्यातून हे सर्व नेते निर्दोष कसे सुटले, याची दखल सत्ताधारी भाजपाने घेण्याची गरज आहे. दिल्लीप्रमाणे येथे तामिळनाडूत अशा केसेसचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (M.K.Stalin) यांनी केले आहे. ते कोइम्बतूरमधील द्रमुक पश्चिम क्षेत्र बूथ कमिटी सदस्यांच्या प्रशिक्षण परिषदेत बोलत होते. स्टॅलिन (M.K.Stalin) म्हणाले की, भाजपने दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खोटे खटले अर्थात दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरण दाखल करून आणि त्यांना तुरुंगात टाकून भित्रेपणाचे कृत्य केले. त्यांच्याकडे (भाजपा) प्रामाणिकपणे आणि सरळ पद्धतीने निवडणुकांना सामोरे जाण्याचे धाडस नव्हते. आता दिल्ली न्यायालयाने म्हटले आहे की, केजरीवाल यांच्याविरोधातल्या खटल्याला कोणताही आधार नव्हता. M.K.Stalin अरविंद केजरीवाल आणि त्यांचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी तुरुंगात घालवलेले दिवस भाजप परत करू शकेल का? ते दिल्लीत पुन्हा निवडणुका घेऊ शकतील का? ते तामिळनाडूमध्येही तेच सूत्र लागू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या पोकळ धमक्यांना घाबरण्यासाठी आम्ही गुलाम किंवा भित्रे नाही. आम्ही धैर्याने त्याचा सामना करू. तामिळनाडू भाजपाचा वेगळा सूर (M.K.Stalin) तामिळनाडू निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने वेगळा सूर लावत असल्याचा आरोप करत स्टॅलिन म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी अचानक दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचे कौतुक करायला सुरुवात केली आहे. मोदींना अचानक त्यांच्याबद्दल प्रेम का निर्माण झाले आहे? जयललिता यांनी त्यांना दिलेले आव्हान ते विसरले आहेत का? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे भारतातील सर्वात भ्रष्ट सरकार म्हणजे अण्णा द्रमुक सरकार होते, हे ते विसरले आहेत का? केंद्रात भाजपच्या १२ वर्षांच्या राजवटीत त्यांनी तामिळनाडूसाठी काहीही केले नाही, मोदी आता फक्त मते मिळविण्यासाठी जयललिता यांचे गुणगान गात आहेत.