तंजावर : सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी विधेयकांच्या मंजुरीसाठी राज्यपालांसाठी कालमर्यादा निश्चित करणारा आदेश दिला. मात्र, त्या आदेशानंतरही तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांच्यात बदल झालेला नाही, असे टीकास्त्र त्या राज्याचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी सोडले. माजी मुख्यमंत्री आणि स्टॅलिन यांचे वडील दिवंगत एम.करूणानिधी यांच्या नावाने एक विद्यापीठ तमिळनाडू सरकार उभारणार आहे. त्यासाठीचे विधेयक सरकारने रवी यांच्याकडे पाठवले. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचा विषय स्टॅलिन यांनी एका सरकारी कार्यक्रमात उपस्थित केला. रवी यांनी ४० दिवसांचा कालावधी उलटूनही विधेयकाला मंजुरी दिलेली नाही. विधेयकासंदर्भात मी राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांना रवी यांची भेट घेण्यास सांगितले. मात्र, रवी यांनी अद्याप मंत्र्यांना भेटीची वेळ दिलेली नाही. त्यांच्याकडे यापेक्षा अधिक महत्वाचे कुठले काम असेल? एकीकडे राज्यपाल आहेत; तर दुसरीकडे निधी जारी न करणारे केंद्र सरकार आहे. मात्र, आव्हानांना सामोरे जाऊन आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. विविध योजना राबवून जनतेच्या आकांक्षा पूर्ण करत आहोत. जनतेकडून उत्साहात होणारे स्वागत त्यांचे समाधान दर्शवते, असा दावा त्यांनी केला.