M. K.Stalin : द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडी विस्तारणार; मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे संकेत

चेन्नई : द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत आणखी काही पक्ष सहभागी होण्याची शक्यता तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्या राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी सत्तारूढ आघाडी विस्तारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी निवडणुकीत तमिळनाडूतील विधानसभेच्या एकूण २३४ पैकी २०० जागा जिंकण्याचे लक्ष्य सत्तारूढ आघाडीने निश्चित केले आहे.
निवडणुकीची तयारी द्रमुकने खूप आधीपासून सुरू केली आहे. सध्याची स्थिती पाहता आणखी काही पक्ष आमच्या गोटात येण्याची चिन्हे आहेत. योग्यवेळी त्यांना सामावून घेण्यात येईल. त्यामुळे जागांच्या निर्धारित लक्ष्यापलिकडेही कदाचित आम्ही मजल मारू, असा विश्वास द्रमुकचे प्रमुख असणाऱ्या स्टॅलिन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीत कॉंग्रेस, डाव्या पक्षांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी आघाडीत समावेश नसणाऱ्या पीएमकेचे संस्थापक रामदास यांची भेट घेतली. त्या पार्श्वभूमीवर, स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे महत्व वाढले आहे. तमिळनाडूत पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यासाठी आता वर्षभरापेक्षाही कमी अवधी उरला आहे.





