India Most Expensive Number Plate : हरियाणातील हिसार येथे कार नंबर प्लेटसाठी देशातील सर्वात मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. ‘HR88B8888’ या व्हीआयपी नंबर प्लेटसाठी झालेल्या लिलावात तब्बल 1.17 कोटी रुपयांची अविश्वसनीय बोली लागली आहे. त्यामुळे हा क्रमांक भारतातील सर्वात महागडा वाहन नोंदणी क्रमांक ठरला आहे. या खास श्रेणीतील नंबरसाठी बुधवारी लिलाव झाला. सुरुवात फक्त 50, 000 रुपये पासून झाली होती, पण बोली वाढत वाढत दुपारी 88 लाखांपर्यंत, तर अखेरीस संध्याकाळी 1 कोटी 17 लाखांवर जाऊन थांबली. एकूण 45 जणांनी या नंबरसाठी स्पर्धा केली. ही बोली हिसारमधील 30 वर्षीय तरुण उद्योजक सुधीर कुमार यांनी जिंकली. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून, त्याचसोबत सॉफ्टवेअर कंपनीही ते चालवतात. माध्यमांशी बोलताना सुधीर म्हणाले, “माझे ठराविक बजेट नव्हते. मला ‘8888’ हा अंक खूप आवडतो, त्यामुळे बोली लावायचे ठरवले. इतकी चर्चा होईल असं अपेक्षित नव्हतं.” ‘8888’ या नंबरची किंमत वाढण्यामागे काही खास कारणे आहेत : ‘8’ हा अंक शुभ मानला जातो, विशेषतः व्यवसायिक जगतात. सलग चार आठ (8888) हा क्रमांक अत्यंत खास समजला जातो. नंबर सीरिजमधील ‘B’ हे अक्षर दिसायला ‘8’सारखे भासते, त्यामुळे हा क्रमांक आणखी आकर्षक ठरतो. लिलाव प्रक्रिया कशी होते? – व्हीआयपी नंबर प्लेटचा लिलाव RTO च्या अधिकृत पोर्टलवर केला जातो. – बोली शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवार सकाळपर्यंत खुली असते. – निकाल बुधवारी संध्याकाळी जाहीर केले जातात. – बोली जिंकल्यानंतर संपूर्ण रक्कम भरण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली जाते.