“लम्पी स्किन’ चा जिल्ह्याला विळखा !

नगर -उत्तर भारतातील अनेक राज्यात थैमान घालत असलेल्या लम्पी स्किन व्हायरस या जनावरांच्या आजाराने आता नगर जिल्ह्याला विळखा टाकला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी या आजाराने बाधित जनावरे आढळून येत असल्याने पशुपालकांत खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील अकोले, श्रीरामपूर, नेवासे, संगमनेर, राहुरी तालुक्यात बाधित जनावरे आढळली आहेत. जिल्हा प्रशासनानेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून बाधित जनावरे आढळून आलेल्या गावांपासून 10 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.
साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवांचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला आहे. तसेच 5 किलोमीटर त्रिज्येच्या परिसरातील गावांमध्ये बाधित जनावरे वगळता इतर जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. बाधित परिसरात स्वच्छता व निर्जंतूक द्रावणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे. रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा नियंत्रणासाठी औषध फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
श्रीरामपूर तालुक्यात लम्पी, लसीकरणाला सुरुवात
<श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द व टाकळीभान येथे काही जनावरांमध्ये लंपी रोगाची लक्षणे आढळली आहेत. यामुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. जनावरांसाठी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. सध्या जनावरांच्या लसीकरणासाठी सहा पथके स्थापन करण्यात आली असून पाच हजार लसी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे एक संकरित गायीचे वासरू व टाकळीभान येथे एक गायीला लंपी सदृश्य आजाराची लागण झाल्याची माहिती श्रीरामपूर तालुका पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाल्यानंतर तत्काळ रक्ताचे नमुने पशूरोग अन्वेषण विभाग पुणे येथे समक्ष पोहोच करण्यात आले. ही जनावरे बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ज्या भागात असे जनावरे आढळले आहेत, त्या भागाच्या पाच किलोमीटर परिसरात लसीकरण मोहीम हाती घेतली.
“तो’ बाजार हटवला
<नगर-मनमाड मार्गावर राहुरी सुतगिरणी जवळील मोकळ्या मैदानात बुधवारी भरलेला जनावरांचा अनधिकृत बाजार पोलिस प्रशासन व पशुवैद्यकीय विभागाने हटवला आहे. जनावरांमध्ये सध्या फऱ्या आणि लम्पी स्किन या आजाराचा फैलाव वाढत असल्याने अनेक ठिकाणी आठवड्याला भरणारे जनावरांचे बाजार स्थगित ठेवण्याचे आदेश आहेत. राहुरी तालुक्यातील व्यापारी व शेतकऱ्यांनी नगर-मनमाड मार्गावरील राहुरी सुतगिरणी जवळील मोकळ्या मैदानात जनावरांचा बाजार भरला. या बाजारात जवळपास 300 ते 400 जनावरे, 100 ते 200 जनावरे वाहतूक करणाऱ्या वाहनांसह व्यापारी व शेतकरी हजर होते.हा बाजार भरल्याचे समजताच प्रशासनाची धावपळ उडाली. पशु वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती समजताच त्यांनी तातडीने पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याशी संपर्क केला. पोलिस प्रशासनाने जनावरांच्या बाजार भरलेल्या ठिकाणी पाठवल्यानंतर हा बाजार हटवला.
===================





