Lt Gen Rajiv Ghai : लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना बढती; डेप्युटी चीफ ऑफ आर्मी (स्ट्रटर्जी) पदावर झाली नियुक्ती

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणा-या लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना डेप्युटी चीफ ऑफ आर्मी (स्ट्रटर्जी) या पदावर बढती दिली आहे. या पदाखाली, भारतीय लष्कराच्या सर्व ऑपरेशनल शाखा थेट डेप्युटी चीफ ऑफ आर्मी यांना अहवाल देतात. संरक्षण मंत्रालयाने अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली.
संरक्षण मंत्रालयाने दिलेली माहिती अशी, भारतीय सैन्य आणि गुप्तचर संस्थेसह इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी डेप्युटी चीफ ऑफ आर्मी हे पद निर्माण करण्यात आले आहे. हे भारतीय सैन्यातील महत्त्वाच्या पदांपैकी एक पद असेल. ४ जून रोजी झालेल्या संरक्षण प्रतिष्ठान समारंभ २०२५ दरम्यान लेफ्टनंट राजीव घई यांना उत्तम युद्ध सेवा पदक प्रदान करण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय सैन्याच्या पत्रकार परिषदेचे नेतृत्व केले.
पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्यासोबत युद्धविरामसाठी फोनद्वारे चर्चा केली, त्यानंतर त्यांनी १२ मे रोजी पत्रकार परिषदेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामची घोषणा केली. दरम्यान, फेब्रुवारीमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनीही मणिपूरला भेट दिली. यावेळी त्यांनी भारत म्यानमार सीमेची पाहणीही केली. मणिपूरच्या त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला, मुख्य सचिव आणि डीजीपी यांचीही भेट घेतली होती.





