IPL 2025 : IPLपूर्वीच LSG ला मोठा धक्का ! ‘हा’ खेळाडू स्पर्धेला मुकणार

नुकतीच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपली. यानंतर आता सर्व क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहे ते आयपीएलचे. 22 मार्च पासून IPLचा 18 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. मात्र ही स्पर्धा सुरु होण्याआधीच लखनौ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. या संघातील वेगवान गोलंदाज संघातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
‘हा’ खेळाडू स्पर्धेला मुकणार
आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी लखनौ सुपर जायंट्स संघाचा स्टार गोलंदाज मयंक यादव स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. मयंक अद्याप त्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केल्यानंतर त्याला पाठीला दुखापत झाली होती. मयंक यादव सध्या बेंगळुरूमधील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पुनर्वसन करत आहे.
त्याने अलीकडेच गोलंदाजी सुरू केली. त्यामुळे मयंक कधी परतेल याबद्दल काहीही सांगता येत नाही. जर तो फिटनेस मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात यशस्वी झाला तर तो आयपीएल 2025 च्या दुसऱ्या टप्प्यात लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळू शकतो. लखनौ सुपर जायंट्सने मेगा लिलावापूर्वी 11 कोटी रुपयांवर त्याला संघात कायम ठेवले.
मयांक यादव बद्दल बोलायचे झाले तर त्याने गेल्या आयपीएल हंगामात ताशी 155 किमी वेगाने गोलंदाजी करून प्रसिद्धी मिळवली होती. 2023 च्या हंगामात मयंक दुखापतीमुळे बाहेर होता, परंतु गेल्या हंगामात त्याने पंजाब किंग्जविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्धच्या पुढच्या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या, ज्यामुळे तो सलग दोन सामन्यांमध्ये प्लेयर ऑफ द मॅच ठरला होता.





