Chhagan Bhujbal : तीन महिन्यांनी LPG गॅस बंद होणार? छगन भुजबळांचे मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Chhagan Bhujbal : राज्यात गॅस टंचाईचे संकट उभे ठाकले असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी मोठं वक्तव्य केले आहे.

Chhagan Bhujbal : आखातात युद्धाचा भडका उडाला असून, युद्धाची झळ भारतासह सर्व देशांना बसली आहे. गेल्या काही दिवसांपासून एलपीजी गॅस सिंलेंडरचा प्रचंड तुटवडा जाणवत असून, सर्वसामान्य तसेच व्यावसायिकांचे हाल होत आहेत.
येत्या काही दिवसांमध्ये कदाचित परिस्थिती आणखी भीषण बनू शकते, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याने भुवया उंचावल्या आहेत.
तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी गॅसचा पुरवठा बंद होऊ शकतो, असे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. ते शनिवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या केंद्र सरकारच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या पत्रकाचा उल्लेख करत राज्यातील पीएनजी गॅसच्या जोडण्या वाढवण्याची गरज व्यक्त भुजबळांनी व्यक्त केली.
दिल्लीत बैठक Chhagan Bhujbal
आज दिल्लीत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला देशातील राज्यांच्या सचिवांना आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना बोलवण्यात आले होते. या बैठकीत एलपीजी गॅस टंचाईवर चर्चा करण्यात आली. तसेच देशातील निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुलभपणे कसा करता येईल? यामध्ये कोणत्या अडचणी आहेत, याचा आढावा देखील घेण्यात आला.

Chhagan Bhujbal : तीन महिन्यांनी LPG गॅस बंद होणार? छगन भुजबळांचे मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
या बैठकीला केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर , पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी, प्रल्हाद जोशी हे केंद्रीय मंत्री उपस्थित होते. प्रत्येक राज्याचे मंत्री आणि सेक्रेटरींनी या बैठकीत काही सूचना केल्या. आपण केंद्र सरकारला सांगितले की, पीएनजी गॅस सध्या स्वस्त पडत आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. त्याचा जास्त प्रसार झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या एका पत्रकात तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल, असा उल्लेख होता. त्यामुळे आपण पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करुन घेतल्या पाहिजेत, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळांनी केले. त्यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, पीएनजी जोडण्या लवकर करायच्या आहेत. पाइपलाइन टाकण्यासाठी विविध विभागांत परवानग्या मागितल्या जातात. पीएनजी साठीची परवानगी मिळाली, असे समजावे. या परवानग्या 24 तासांत दिल्या जातील. पीएनजी काम करणाऱ्यांना 24 तास परवानगी राहील, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
सध्याच्या परिस्थितीवर उपाय म्हणून राज्यात केरोसीन द्यायला सुरुवात करण्यात आली आहे. याविषयी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, आपल्याकडे केरोसीन उपलब्ध असताना आपण ते देऊ शकत नव्हतो. कारण उच्च न्यायालयाने त्यावेळी एक आदेश दिला होता. आता आपण न्यायालयाला कळवले आहे. साडेतीन हजार लिटर केरोसीन राज्यात उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पेट्रोल पंपावर केरोसीन टँकर ठेवून तिथे मिळेल अशी व्यवस्था करु, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा : Summer Fashion: उन्हाळ्यातही दिसा फ्रेश आणि स्टायलिश! या ५ सोप्या टिप्सने बदला तुमचा लुक





