प्रभात वृत्तसेवा पुणे – बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गात जाहीर झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील निष्ठावंत, तळागाळापर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नगराध्यक्षपदाची संधी द्यावी, अशी मागणी बारामती शहरातून होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील बहुजन समाजातील (ओबीसी) कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यास संघटनवाढीला चालना मिळेल, अशी आशा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. बारामती नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदाची जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. प्रस्थापित, प्रबळ नेते हे इच्छुकांच्या शर्यतीत आहे. गुरुवारी (दि.१३) रोजी बारामती नगराध्यक्षपदाची उमेदवाराची घोषणा होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक तोंडावर आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसचे माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार संग्राम थोपटे गेले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने हे भाजपवासी झाले आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या पडझडीत बारामती नगराध्यक्षपदासाठी तळागाळातील कार्यकर्त्याला जर संधी दिली तर राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील पार्थ पवार यांचे भूखंड प्रकरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे अजित पवार हे बॅकफूटवर गेले आहेत. त्यात ओबीसी समाजाची नाराजी आहे. त्यामुळे आता सध्या तळागाळात परिस्थिती ही थोडीशी वेगळी आहे, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. भाजपच्या संघटनबांधणीचा अभ्यास गरजेचा.. राष्ट्रवादी अजित पवार गटात ओबीसी समाजातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना मोठ्या पदावर संधी देण्याची गरज आहे. त्यातून राष्ट्रवादीचे संघटन मजबूत होईल. पक्षाची गावागावांत तसेच शहरात बांधणी होणार आहे. सध्या २० ते २५ वर्षांचे तरूण भाजपकडे आकर्षित होत आहेत. तो ओघ थांबेल. राष्ट्रवादीच्या प्रतिमेमध्ये सुधारणा होणार आहे, असा सूर उमटत आहे. प्रस्थापित नेत्यांना संधी दिली तर तरुण पिढी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे केडर कमकुवत झाले आहे. त्यासाठी हा केडर विकसित करून त्यांना बळ देणे गरजेचे आहे.अजित पवार यांनी तळागाळातील कार्यकर्त्याला मोठ्या पदावर संधी दिल्याचा संदेश जिल्ह्यात जाऊ शकतो. ओबीसी समाजाला संधी दिल्याने जिल्ह्यात एक चांगला संदेश जाईल. त्यातून अजित पवार गटाला त्याचा लाभ नक्कीच होईल, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमटत आहे.