सत्ताधाऱ्यांकडून खालच्या पातळीवरील राजकारण

समोरासमोर बसलो, तर सगळे सांगेल : अजित पवार

पुणे  – सत्तेत असणाऱ्यांनी खालच्या पातळीवरील राजकारण सुरू केले आहे. “तुझे काम करतो, तु आमच्या पक्षात ये’, “तुम्ही असे करा नाही, तर तुमची चौकशी करतो’ असे सांगून लोकांना छळण्याचे काम सुरू आहे. “सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता’ असा प्रकार सत्ताधाऱ्याकडून सुरू असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर जे जे आमच्यातून सत्ताधारी पक्षात गेले ते कुठल्या कारणाने गेले याची सर्व माहिती मला आहे. समोरासमोर बसलो, तर मी सगळे सांगेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार मोहन जोशी व बारामती लोकसभा मतदार संघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील विश्‍वजित कदम, दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, कॉंग्रेसचे रमेश बागवे आदी उपस्थित होते.

“आम्ही सुद्धा सत्तेत होतो, पण सत्तेचा माज कधी येऊ दिला नाही. विरोधकांची कामे केली, पण त्यांना पक्षात या तरच काम करतो, असे कधीही केले नाही. पक्षात घेण्यासाठी सत्ताधारी सध्या साम-दाम-दंड-भेद यांचा वापर करत आहेत. हे लोकशाही व्यवस्थेला घातक ठरणार आहे.त्यामुळेच आता अशा धोकादायक सरकारला बदलायला पाहिजे. पुन्हा जर हे सरकार निवडून आले, तर पुढे निवडणुका सुद्धा होणार नाहीत. असे बोलले जात आहे. त्यामुळे ही निवडणूक तुमच्या आमच्या भविष्यासाठी आहे. हेवेदावे विसरून आपण सगळ्यांनी एक दिलाने काम केले तरच यांना पराभूत करू शकू. गेल्या वेळेला काही चुका झाल्या त्या आता होऊ देऊ नका’, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

“लोकशाहीमध्ये विरोधकांना बोलण्याचा अधिकार असतो. सरकारचे एखादे चुकले तर त्याबाबत जाब विचारण्याचा अधिकार आहे, पण सध्या असा कुठलाही अधिकारच विरोधकांना ठेवलेला नाही. थोडा जरी विरोध केला तर लगेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. ही ठोकशाही चुकीची आहे. त्यासाठी आपल्याला ही सत्ता बदलून टाकायची आहे’, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. “तुमची, आमची घरे उध्वस्त करण्याचे काम सध्या सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखविण्याची गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे’, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.