Low hemoglobin symptoms: हिमोग्लोबिन हे रक्तातील लाल पेशींमध्ये असलेले महत्त्वाचे प्रथिन आहे. हे फुफ्फुसांमधून शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे कार्य करते. जेव्हा हिमोग्लोबिन कमी होते तेव्हा शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. हिमोग्लोबिनचे सामान्य प्रमाण पुरुषांमध्ये : 13.8 ते 17.2 ग्रॅम प्रति डेसीलीटर (g/dl) स्त्रियांमध्ये : 12.1 ते 15.1 g/dl मुलांमध्ये : 11 ते 16 g/dl हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊन ती 8 ते 5 g/dl पर्यंत गेली तर ती धोकादायक ठरते. हिमोग्लोबिन कमी झाल्यावर दिसणारी लक्षणे सतत थकवा येणे चक्कर येणे श्वास घेण्यास त्रास होणे त्वचेचा रंग फिकट किंवा पिवळसर दिसणे हृदयाची धडधड वाढणे डॉक्टरांच्या मते हिमोग्लोबिन 8 g/dl च्या खाली गेल्यास शरीर खूपच अशक्त होते, तर 5 g/dl पेक्षा कमी झाल्यास तातडीने उपचारांची गरज असते. अशावेळी मृत्यू होण्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. हिमोग्लोबिन कमी होण्याची प्रमुख कारणे 1. पोषक तत्त्वांची कमतरता आहारात लोह (Iron), व्हिटॅमिन B12 आणि फोलेट यांची कमतरता असल्यास हिमोग्लोबिन कमी होते. लोह हे हिमोग्लोबिन बनण्यासाठी आवश्यक असते. तर व्हिटॅमिन B12 आणि फोलेट लाल रक्तपेशी निर्माण करण्यात मदत करतात. 2. दीर्घकालीन आजार किडनीचे विकार, कर्करोग, संधिवात किंवा इतर दीर्घकालीन संसर्गामुळे रक्तपेशी निर्माण होण्याची क्षमता कमी होते. 3. अत्यधिक रक्तस्राव शस्त्रक्रियेदरम्यान, अपघातात, महिलांमध्ये जास्त मासिक पाळीमुळे किंवा इतर कारणांनी रक्त गमावल्यास हिमोग्लोबिन पटकन कमी होते. 4. हाडांचा मज्जाविकार (Bone marrow disorders) ल्यूकेमिया किंवा अप्लास्टिक अॅनिमिया सारखे विकार लाल रक्तपेशी तयार होण्याची क्षमता कमी करतात. 5. आनुवंशिक विकार सिकल सेल अॅनिमिया किंवा थॅलेसेमिया यांसारख्या विकारांमुळे रक्तात कार्यक्षम हिमोग्लोबिन तयार होत नाही. 6. औषधांचा परिणाम कर्करोगाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे रक्तपेशींचे उत्पादन कमी होते. हिमोग्लोबिनची कमतरता टाळण्यासाठी उपाय लोहयुक्त आहार घ्या पालक, मेथी, हरभरा, राजमा, डाळी, मांस, कडधान्ये, तसेच फोर्टिफाइड धान्ये आहारात घ्या. व्हिटॅमिन C चे सेवन वाढवा संत्री, मोसंबी, टोमॅटो यांसारखी फळे खाल्ल्याने लोहाचे शोषण चांगले होते. नियमित तपासणी करा जर कुटुंबात कोणाला अॅनिमिया असेल तर वेळोवेळी रक्त तपासणी करून घ्या. व्हिटॅमिन B12 आणि फोलेट घ्या दूध, अंडी, हिरव्या भाज्या, डाळी आणि धान्य यांचा आहारात समावेश करा. थोडक्यात सांगायचे झाले तर हिमोग्लोबिनची कमतरता ही फक्त थकव्याचे लक्षण नसून ती गंभीर आजारांचे कारण ठरू शकते. वेळेवर आहार, तपासणी आणि उपचार घेतल्यास या समस्येवर नियंत्रण ठेवता येते.