लोव्हलिना, निखत, नीतूचा ‘पंच’; राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान निश्चित

नवी दिल्ली – विश्वविजेती निखत जरीन आणि ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती लोव्हलिना बोरगोहेन यांनी निवड चाचणीत वर्चस्व राखून राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारतीय संघात आपले स्थान निश्चित केले आहे. याशिवाय युवा विश्वविजेती नीतू घनघास आणि जास्मिन लांबोरिया यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, सहा वेळची विश्वविजेती मेरी कोम आणि एल. सरिता देवी यांना स्थान मिळविता आले नाही.
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी राष्ट्रीय चाचण्यांची अंतिम फेरी पार पडली. या फेरीमध्ये एकूण चार वजन गटांतील सामने घेण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती लोव्हलिनाने राष्ट्रीय चाचण्यांतील अंतिम सामन्यात एकतर्फी विजय नोंदवला. 70 किलो वजनीगटामध्ये 24 वर्षीय लोव्हलिनाने प्रतिस्पर्धी पूजाचा 7-0 असा पराभव केला.
त्याचबरोबर जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या निखत जरीननेही अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. तिने 50 किलो वजनी गटात मीनाक्षीचा 7-0 असा एकतर्फी पराभव केला. युवा विश्वविजेत्या नीतूने 48 किलो वजनी गटात मंजू राणीचा 5-2 असा पराभव केला. तर, 60 किलो वजनी गटात जास्मिनने विश्वविजेती असलेल्या परवीनचा 6-1 असा पराभव करत पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्चित केले.
दरम्यान, 2018मधील राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती एमसी मेरी कोम राष्ट्रीय चाचण्यांच्या उपांत्य फेरीत जखमी झाली. त्यामुळे तिला माघार घ्यावी लागली. मेरी कोमने 48 किलो वजनी गटात माघार घेतल्याने नीतूला विजेता घोषित करण्यात आले होते. दरम्यान, येत्या 28 जुलैपासून इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जवळपास 72 देशांतील पाच हजार 54 खेळाडू सहभाग घेण्याची शक्यता आहे.

