प्रभात वृत्तसेवा पुणे – लग्नाच्या आमिषाने तरुणीला आपल्या जाळ्यात खेचल्यानंतर व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून तिची सहा लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी ३२ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार बंडगार्डन पोलिसांनी प्रसाद संतोष कराडे (वय ३०, रा. पंचवटी नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मार्च 2025 मध्ये तरुणीचा आरोपीसोबत परिचय झाला होता. त्या वेळी त्याने तरुणीचा लग्नाच्या आमिषाने विश्वास संपादन केला. यानंतर एकेदिवशी आरोपीने तरुणीला व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून आरटीजीएस आणि फोन पे-द्वारे सहा लाख रुपये घेतले. तरुणीने त्याच्याकडे पैशांची मागणी केल्यावर आरोपी प्रसादने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते करीत आहेत.