प्रभात वृत्तसेवा पुणे – सोशल मीडियावर झालेल्या ओळखीचे प्रेमात रूपांतर होऊन पुण्यातील दोन अल्पवयीन मुली कोणालाही न सांगता थेट राजस्थानात पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काळेपडळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत तब्बल ३३०० किलोमीटरचा पाठलाग करून दोन्ही मुलींना सुखरूप पुण्यात परत आणले. याप्रकरणी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ आणि १६ वर्षांच्या या दोन्ही मुली मैत्रिणी आहेत. त्यापैकी एका मुलीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून राजस्थानातील सुरेशकुमार वडदाराम प्रजापती याच्याशी ओळख झाली. सुमारे महिनाभराच्या संवादानंतर ती त्याच्या प्रेमजाळ्यात अडकली. आरोपीने तिला आपल्या राजस्थानातील गावात येण्याचे आमंत्रण दिले. ही बाब तिने मैत्रिणीला सांगितल्यानंतर तीही तिच्यासोबत जाण्यास तयार झाली. दरम्यान, दि. २८ नोव्हेंबर रोजी दोन्ही मुली घरच्यांना कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. त्या आधी मुंबईला पोहोचल्या आणि तिथून राजस्थानकडे रवाना झाल्या. रात्रीपर्यंत मुली घरी न परतल्याने कुटुंबीयांनी एकमेकांशी संपर्क साधून दोन्ही मुली बेपत्ता असल्याची खात्री झाल्यानंतर दि. २९ नोव्हेंबर रोजी काळेपडळ पोलिसांत बेपत्ता तक्रार दाखल केली. मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे युनिट- पाचही तपासात सहभागी झाले. तांत्रिक तपासाद्वारे मुलींचे मोबाइल व सोशल मीडिया हालचालींचे विश्लेषण केल्यावर मुली राजस्थानात असल्याचे समजले. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक अजय हंचाटे व पथकाने वापी, सुरत, अहमदाबाद, फालना, शिवगंज, राणी, पाली आणि जोधपूर अशा विविध ठिकाणी शोध घेत तब्बल ३३०० किलोमीटरचा प्रवास केला. राजस्थानातील राणी परिसरात एक मुलगी आरोपी सुरेशकुमार (२१) याच्यासोबत आढळून आली. चौकशीत सुरेशकुमारने मुलीला राजस्थानात बोलावल्याची कबुली दिली. त्याने आपल्या मित्र सुरेशकुमार मोहनलाल राणीभील (३१) याच्याशी दुसऱ्या मुलीची ओळख करून दिल्यावर ते दोघे पाली येथे गेल्याचे उघड झाले. पथकाने पाली येथे जाऊन दुसऱ्या आरोपीसह दुसऱ्या मुलीलाही ताब्यात घेतले. राजस्थानात पोहोचल्यानंतर दोन्ही मुलींना आपल्या चुकीची जाणीव झाली होती. काळेपडळ पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पोक्सो कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.