Pradeep Rawat : पहिल्या भेटीतच जडले प्रेम, नंतर घेतले सात फेरे; अशी होती प्रदीप रावत यांची लव्हस्टोरी
Pradeep Rawat : प्रदीप रावत यांच्या निधानाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कल्याणी रावत आणि दोन मुले असा परिवार आहे.

Pradeep Rawat’s love story : भारतीय चित्रपटसृष्टीने एक प्रभावी आणि बहुआयामी कलाकार गमावला आहे. आपल्या दमदार आवाजाने, प्रभावी व्यक्तिमत्त्वाने आणि स्मरणीय खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन झाले आहे. रक्ताच्या कर्करोगाशी जवळपास पाच वर्षे झुंज केल्यानंतर त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनेक सिनेमांमध्ये निर्दयी खलनायकाची भूमिका साकारणारे प्रदीप रावत प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अत्यंत शांत, साधे आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपल्या कुटुंबाला नेहमीच प्रसिद्धीपासून दूर ठेवले. मात्र, कुटुंसोबत त्यांचा जिव्हाळा कायम असायचा. प्रदीप रावत यांच्या निधानाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कल्याणी रावत आणि दोन मुले असा परिवार आहे.
मैत्री, प्रेम आणि विवाह
प्रदीप रावत आणि कल्याणी यांची प्रेमकहाणीही एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखीच होती. तेलुगू चित्रपट ‘स्टालिन’च्या शूटिंगदरम्यान दोघांची पहिली भेट झाली. त्या वेळी प्रदीप रावत यांनी प्रकाश राज यांच्या जावयाची भूमिका साकारली होती. कल्याणीला पाहताच ते तिच्या प्रेमात पडले होते, मात्र थेट संवाद साधण्याचे धाडस त्यांना झाले नाही. अखेर त्यांनी आपल्या मेकअप आर्टिस्टमार्फत संवादाची सुरुवात केली. त्यातून मैत्री, प्रेम आणि पुढे विवाह असा त्यांच्या नात्याचा प्रवास घडला.
‘महाभारत’ मालिकेत अश्वत्थामाची भूमिका
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे जन्मलेल्या प्रदीप रावत यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास संघर्षमय होता. १९८५ मध्ये ‘मेरी जंग’ या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्यांना लहान-मोठ्या भूमिका मिळाल्या. मात्र, बी. आर. चोप्रा यांच्या लोकप्रिय ‘महाभारत’ मालिकेत अश्वत्थामाची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला नवी दिशा मिळाली.
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये खलनायक
२००४ मध्ये एस. एस. राजामौली यांच्या ‘सई’ या चित्रपटातील भिक्षू यादव या खलनायकाच्या भूमिकेने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. या भूमिकेनंतर ते तेलुगू चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या खलनायकांपैकी एक बनले. ‘भद्रा’, ‘अंदरिवादू’, ‘छत्रपती’ आणि ‘लक्ष्मी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी लक्षवेधी नकारात्मक भूमिका साकारल्या.
लगान आणि गजनीतील भूमिकेने मिळाली प्रसिद्धी
२००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ ‘गजनी’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खलनायकाची भूमिका इतकी गाजली की चित्रपटाचे नावही त्या पात्रावरून ठेवण्यात आले. पुढे आमिर खान अभिनीत हिंदी ‘गजनी’मध्येही त्यांनी तीच भूमिका साकारली. हा चित्रपट १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणाऱ्या बॉलिवूडमधील तेव्हाच्या आघाडीच्या चित्रपटांच्या यादीत सहभागी झाला. या चित्रपटाने खूप मोठी प्रसिद्धी प्रदीप रावत यांना मिळवून दिली. याशिवाय ‘लगान’ चित्रपटातील ‘देवा’ ही भूमिकाही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती.
प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहून केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर ओळख निर्माण करणाऱ्या प्रदीप रावत यांनी हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इतर चित्रपटसृष्टीत मानाचे स्थान मिळवले. त्यांच्या निधनाने भारतीय मनोरंजनविश्वातील एक प्रभावी अध्याय संपला असून, त्यांच्या भूमिका कायम चाहत्यांच्या स्मरणात राहतील.








