नगर | व्हॅलेनटाईनसाठी ऑनलाइनवर सवलतींची बरसात

नगर, (प्रतिनिधी) – व्हॅलेनटाईन डे’निमित्त ऑनलाइन संकेतस्थळावर खरेदीसाठी सवलतींची बरसात आहे. 40 ते 80 टक्क्यांपर्यंत सवलती देण्यात येत आहे. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचा उत्साह वाढला आहे. 14 फेब्रुवारीला ग्राहकांनी अधिक खरेदी करावी यासाठी विविध खरेदी संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांनी गिफ्ट शॉपीकडे पाठ फिरविली होती.
गेल्या काही वर्षांत तरुणांमध्ये समाजमाध्यमांच्या वाढलेला प्रभावामुळे ‘व्हॅलेनटाइन डे’च्या शुभेच्छा समाजमाध्यमांवर संदेश पाठवून देण्यात येत असल्या तरी बाजारपेठेत खास भेटवस्तू आणि गुलाब खरेदी करण्यासाठी तरुणांची गर्दी कायम आहे. गुलाब खरेदी करतानाही ‘टॉप सिक्रेट’ आणि डच जातीच्या गुलाबांची मागणी वाढली असल्याचे फूलविक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच या प्रेमदिवसाच्या निमित्ताने तरुणांपासून वृद्धांपर्यंत भेटवस्तूंच्या दुकानात कोणीच फिरताना दिसत नव्हते.
बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत असतानाच संकेतस्थळावर विविध सवलती असल्याने ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी करणे पसंत केले. संकेतस्थळावर कपडे, भेटवस्तूंबरोबर फुलांची खरेदीही करण्यात येत आहे. वेगवेगळ्या रंगांच्या कागदात गुंडाळलेले आणि विशिष्ट पद्धतीने सजवलेले गुच्छ ऑनलाइन उपलब्ध आहेत.
अगदी 240 रुपयांपासून या गुच्छांची किंमत आहे. व्हॅलेटाईन डे निमित्त गुलाबाच्या फुलांना असलेल्या मागणीमध्ये दरवर्षी वाढ होताना दिसत आहे. हजारोंच्या संख्येने गुलाबांची, विशेषतः लाल गुलाबाची विक्री होत असून, प्रतिगुलाब ४० रुपयांना विक्री करण्यात येते. व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशीपासूनच मोठ्या प्रमाणात गुलाब फुलांची विक्री होत असते.




