नित्तेंन गोखले
स्वतःला जे ऐकायचे आहे त्या अनुषंगाने विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ बोलत नसतील तर त्यांना ट्विटरवर थेट शिवीगाळ करण्याचा मूर्खपणा जगभरातील काही लोक करताना दिसतात. अविश्वास दाखविणे किंवा मुद्द्यांवर अधिक स्पष्टीकरण मागणे योग्यच आहे; परंतु तथ्य आणि विचारसरणीमधील युद्धात काही लोकांना ट्विटरवर लाइक्स आणि रिट्विट्स मिळाल्याने ते स्वतः जगातील सर्व सल्लागारांहून अधिक हुशार आहेत, असे वाटू लागले आहे.
भारतीय लष्कराचे सेवानिवृत्त कर्नल, संरक्षण पत्रकार अजय शुक्ला गेले काही दिवस लडाख सीमेवर चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेबाबत विस्तृतपणे माहिती देत आहेत. शुक्ला यांनी जम्मू-काश्मीरमध्ये वीसपेक्षा जास्त वर्षे सैन्य-अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे लेह-लडाखच्या कानाकोपऱ्यांची त्यांना माहिती आहे.
परंतु त्यांच्या रिपोर्टिंगचे कौतुक करण्याऐवजी एका विशिष्ट राजकीय पक्षाकडे झुकाव असलेले ट्विटर वापरकर्ते (शुक्ला यांच्या पार्श्वभूमीचा योग्यप्रकारे अभ्यास न करता) त्यांच्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उभे करतात. लडाखमधील परिस्थिती सरकारला योग्यरित्या हाताळता आली नसल्याचे मत मांडल्यामुळे काही लोक त्यांना ट्विटरवर शिवीगाळ करतात. शुक्ला व्यतिरिक्त लडाख विषयावर मत मांडणाऱ्या, सरकारला प्रश्न विचारणाऱ्या भारतीय लष्कराच्या इतर सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना देखील ट्विटर वापरकर्ते सध्या ट्रोल करत आहेत, असे चित्र दिसून येते. थोडा अभ्यास केला तर डॉक्टर, अभियंते, पत्रकार, वकील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना देखील त्यांच्या दैनंदिन जीवनात अशा अनुभवांना सामोरे जावे लागते, हे कळून येते.
तज्ज्ञांना तथ्यांच्या आधारे चुकीचे सिद्ध करता आले नाही की त्यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून वैयक्तिक द्वेषयुक्त, बोचरी टीका करायची काही उच्चशिक्षित पुरुष व महिलांना सवय झाली आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, लोक तज्ज्ञांना आदर आणि सन्मान देईनासे झालेत. हीच वृत्ती अमेरिकेतदेखील दिसून येते. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेकदा सरकारच्या स्वतःच्या तज्ज्ञांवर अविश्वास व्यक्त करतात. ट्रम्प यांच्या ट्विटरच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या बोचऱ्या टीकेला अमेरिकेचे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. एंथनी फौकी तसेच माजी लस तज्ज्ञ, डॉ. रिक ब्राइट कायम सामोरे जातात.
ट्रम्प यांचा स्वतःच्या गुप्तचर संस्थांवर तसेच रोग तज्ज्ञांवर अविश्वास का?
जगात सर्वांत सशक्त व श्रीमंत अशी ओळख असलेल्या अमेरिकेने विविध जागतिक संकटांच्या काळात जगाचे नेतृत्व केले आहे. गेली काही वर्षे आंतरराष्ट्रीय संस्था “ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी इंडेक्स’ अमेरिकेची आरोग्य यंत्रणा ही जगात सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा करत असे; परंतु करोना विषाणू महामारीमुळे ही प्रतिमा चुकीची असल्याचे सिद्ध झाले. याउलट जपान, हॉंगकॉंग, तैवान, दक्षिण कोरिया व सिंगापूर सरकारचे सगळीकडून कौतुक होत आहे. सुरुवातीच्या काळात अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना व्हायरस “फ्लू’ सारखे असल्याचे सांगून विषय गंभीर नसल्याचा दावा केला.
कोविड-19 महामारीचा अमेरिकेला धोका आहे, हे त्यांनी मान्यच केले नाही. ट्रम्पच्या प्रमुख सल्लागाराने त्यांना येणाऱ्या आपत्तीबद्दल इशारा देण्याचा प्रयत्न केला; परंतु ट्रम्प वारंवार करोना विषाणूचा धोका म्हणजे विरोधी पक्षाचे (डेमोक्रॅटिक पक्ष) लोक व बातम्यांच्या वाहिन्या पसरवत असलेली अफवा आहे, असे म्हणून विषयाकडे दुर्लक्ष करत राहिले.
ट्रम्प यांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच अमेरिकेची यंत्रणा योग्य तयारी न करता करोनाला सामोरे जात आहे. ट्रम्प यांचे काही समर्थक सरकारचे अपयश लपविण्यासाठी ब्रिटन व इतर विकसित देशातील असलेल्या खराब परिस्थितीकडे बोट दाखवतात. परंतु वास्तविकता अशी आहे की अमेरिकेत करोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूचा आकडा इटली व स्पेनच्या दुप्पट, तर जगात सर्वात जास्त आहे. मॅक्सवेल स्कूल, सिराकुज (न्यूयॉर्क) विद्यापीठाचे प्रोफेसर, देवाशिष मित्रा यांनी ई-मेलद्वारे केलेल्या चर्चेत ट्रम्प यांच्या अनेक निर्णयांवर त्यांची प्रतिक्रिया दिली.
नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकन गुप्तचर विभागाने एका अहवालात वुहानमध्ये उद्भवणाऱ्या या प्राणघातक विषाणूबद्दल उल्लेख केला होता. त्यानंतर पुन्हा जानेवारी महिन्यात हा अहवाल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दैनंदिन इंटेलिजन्स ब्रीफिंगचा भागदेखील होता, अशी माहिती अनेक पत्रकारांनी दिली आहे. त्यानंतर ट्रम्पच्या सल्लागारांपैकी एक, पीटर नवारो यांनी जानेवारीतच एका मेमोच्या माध्यमातून या विषाणूच्या धोक्याबद्दल सरकारला इशारा दिला होता. ट्रम्प यांच्या 24-25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यादरम्यान त्यांना विषाणूच्या धोक्याबद्दल नक्कीच माहिती होती. परंतु त्यांनी या धोक्याकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. ट्रम्प यांच्या बोलण्यातून त्यांचा
स्वतःच्या गुप्तचर संस्थांवर विश्वास नाही हे जाणवते, असे प्रा. देवाशीष मित्रा म्हणाले.
तज्ज्ञांचा सल्ला केराच्या टोपलीत
ट्रम्प यांनी सुरुवातीच्या काळात तोंडाचे मास्क न वापरण्याचा सल्ल्या आपल्या चाहत्यांना दिला. तज्ज्ञांचे म्हणणे धुडकावून लॉकडाऊन विरोधात आंदोलन करणाऱ्या लोकांच्या समर्थनात निष्काळजीपणे ट्विट करून त्यांना लॉकडाऊन तोडण्यास प्रवृत्त केले. सध्या नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीची तयारी म्हणून त्यांनी राजकीय मेळावेदेखील भरवायला सुरुवात केली आहे.
करोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर हे चुकीचे ठरेल, असे अनेक सल्लागारांनी मांडलेले मत त्यांनी केराच्या टोपलीत टाकले. परिणामी अमेरिकेच्या अनेक राज्यांत कोविड-19चे रुग्ण तसेच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. भारत असो किंवा अमेरिका, राजकारणी मंडळींना बऱ्याचदा तज्ज्ञांचा सल्ला राजकीयदृष्ट्या गैरसोयीचा ठरू शकतो.
वैज्ञानिक, डॉक्टर, संशोधक, पत्रकार किंवा संरक्षण तज्ज्ञ असले तरी ती व्यक्ती समाजासाठी काम करते. सत्य कटू जरी असले तरीदेखील ते लोकांसमोर मांडणे तिचे काम असते. त्यांचे शिक्षण व निवडलेल्या क्षेत्रातला कामाचा अनुभवदेखील कौतुकास पात्र ठरतो. तज्ज्ञांबाबत लोकांच्या मनात द्वेष निर्माण करणे व राजकीय फायद्यासाठी तथ्य झाकणे हे कोणत्याच देशाच्या हिताचे ठरू शकत नाही.