पुरी: करोनाच्या पार्श्वभूमीवर ओडीशातील जगन्नाथ पुरी येथील जगप्रसिध्द रथयात्रेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भगवान जगन्नाथाचे लाखो भाविक न्यायालयाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या यात्रेला सशर्त परवानगी दिली आहे. भाविकांना केवळ मंदिराच्या परिसरातच देवाचे दर्शन घेता येणार आहे. त्यानुसार आज ही रथयात्रा सुरू झाली. रथयात्रेचा हा काळ एक पर्व म्हणून सगळीकडे साजरा केला जातो. काय आहे ही यात्रा आणि तिचे महत्व याबाबत थोडक्यात जाणून घेउ… हिंदू धर्मात या रथयात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे. भाविकांच्या म्हणण्यानुसार भगवान जगन्नाथ या यात्रेद्वारे मंदिरातून बाहेर काढून प्रख्यात माता गुंडीचा मंदिर येथे पोहोचवले जाते. येथे भगवान सात दिवस विश्रांती घेतात. या काळात गुंडीचा माता मंदिरात जोरदार तयारी केली जाते. मंदिराच्या साफसफाईसाठी खास इंद्रद्युम्न सरोवर येथून पाणी आणले जाते. सात दिवसांनंतर परतीची यात्रा सुरू होते. ओडीशातील पुरी हे भगवान जगन्नाथाचे मुख्य स्थळ आहे. या पुरी शहराला पुरूषोत्तम पुरी असेही संबोधले जाते. भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या अर्धनिर्मित लाकडी मूर्त्यांची येथे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. महाराजा इंद्रद्युम्न यांनी त्यांची निर्मिती केली होती. आषाढ शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यात्रेला प्रारंभ होतो. यात्रेच्या काळात भगवान वर्षातून एकदा मंदिरातून बाहेर पडतात आणि भाविकांपर्यंत जातात. त्यांच्यात थेट मिसळतात, त्यामुळेच या यात्रेला प्रचंड महत्व आहे. रथयात्रेच्या अग्रभागी तालध्वज असतो. त्यावर बलराम विराजमान असतात. त्यानंतर पद्मध्वज असतो, त्यावर सुभद्रा असते आणि सगळ्यांत शेवटी गरूण ध्वज असतो व त्यावर भगवान जगन्नाथ स्वत: विराजमान असतात, असे भाविकांचे मानणे आहे. हा रथयात्रेचा अनुपम सोहळा पाहण्यासाठी जगभरातील लाखो भाविक पुरी येथे येत असतात. यंदा करोनाचे सावट असल्याने त्यावर काही बंधने आणि मर्यादा आल्या आहेत. मात्र ओडीशा सरकार आणि केंद्र सरकारनेही हमी दिल्यानंतर यंदाही हा उत्सव संपन्न होत आहे.