लोणी काळभोर: गारपीट आणि वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

लोणी काळभोर– येथे गुरुवारी (दि. १०) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या गारांच्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. अर्धा तास चाललेल्या या अवकाळी पावसाने हवेली तालुक्याच्या पूर्व भागात शेतीला जबर फटका बसला. भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तर ऊस पिकाला काहीसा दिलासा मिळाला. शेतात पाणी साठल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पूर्व हवेलीत उष्णता वाढली होती. आज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने पावसाळ्याच्या तयारीसाठी दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवून वीजतारांजवळील झाडांच्या फांद्या कापल्या. सायंकाळी ५ वाजता काम संपताच वीजपुरवठा सुरू करण्याच्या वेळीच अवकाळी पाऊस कोसळला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तारांवर पडल्या, त्यामुळे पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला.
View this post on Instagram
या गारपीटीमुळे आंब्याच्या कैऱ्या गळून पडल्या, तर कांदा, पालक, कोथिंबीर, मेथी यांसारख्या भाजीपाल्यांचेही मोठे नुकसान झाले. काढणीला आलेल्या मेथी आणि पालकाची पाने गारांनी फोडल्याने ती बाजारात विकण्यायोग्य राहिली नाहीत. पनवेल काकडी तर फेकून देण्याशिवाय पर्याय उरला नाही. शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. “आमचे संपूर्ण वर्षाचे कष्ट वाया गेले,” अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.





