पिंपरी | लोणावळा शहरात तीन तासांमध्ये ८० मिलिमीटर पावसाची नोंद

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरामध्ये मंगळवारी (दि. ४) सायंकाळी ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवघ्या तीन तासांमध्ये लोणावळा शहरात ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मंगळवारी सायंकाळी मावळ तालुका व लोणावळा परिसरामध्ये सोसाट्याच्या वारा, वादळ आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.
अवघ्या तीन तासांमध्ये ८० मिलिमीटर पाऊस झाल्याने काही काळ सर्वत्र पाणी साचले होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आकाशामध्ये अचानक ढगांची दाटी होऊन गडगडाट होऊ लागला. त्यानंतर सहा ते नऊ वाजेपर्यंत सुमारे तीन तास पाऊस झाला. या तीन तासांमध्ये ८० मिलिमीटर पावसाची नोंद झाला.
अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. जोरदार पावसामुळे भांगरवाडी रेल्वे पुलाच्या दुतर्फा निर्माण झालेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना वाहने घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत होती.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी लोणावळा शहरातील सर्व खड्डे व पॅचवर्कचे काम पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्यापही काम पूर्ण न झाल्याने पावसाच्या पहिल्याच तडाक्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.





