लोणार सरोवराच्या पाण्याचे नमुने तपासणार – वनमंत्री संजय राठोड

मुंबई – बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे पाणी गुलाबी रंगाचे झाल्याची घटना घडली. त्या अनुषंगाने या पाण्याचे शास्त्रीय पद्धतीने नमुने घेण्यात आले आहे. तसेच सदर नमुने संशोधनाकरिता नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
लोणार सरोवर हे उल्कापाताने तयार झालेले असून जगातील ते वैशिष्ट्यपूर्ण सरोवर आहे. यातील क्षाराचे प्रमाण जास्त आहे. सरोवरातील पाण्यात विशिष्ट प्रकाराच्या हॅलो बॅक्टेरिया व शेवाळाच्या संयोगातून अशा प्रकारचे गुलाबी रंगाचे पाणी होत असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. तर काही तज्ज्ञांनी डुनलेलीया अल्गी व हॅलो बॅक्ट्रेरिया या जीवाणूमुळे बेटा कॅरोटीन रंगद्रव्य निर्माण झाल्याने लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी होत असल्याचे मत व्यक्त केले.
यापूर्वी इराणमधील क्षारयुक्त सरोवरामध्ये अशा प्रकारे रंगात बदल झाल्याच्या घटना झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चौकशी करण्यात येत असून अन्य कुठल्याही कृत्रिम घटकामुळे पाण्याचा रंग बदललेला नाही, अशी माहितीही वनमंत्री राठोड यांनी दिली.





