Lok Sabha Election 2024 – निवडून येण्याची क्षमता या महत्त्वाच्या निकषावर बहुतांश राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आयात उमेदवारांचा सर्वात जास्त बोलबाला आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश आणि लगेच लोकसभा निवडणुकीचे तिकीट असा राजकीय चमत्कार आयात उमेदवारांच्या बाबतीत घडल्याने या उमेदवारांकडून पक्ष नेत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने या दोन पक्षात आयात उमेदवारांची जास्त संख्या आहे. लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आतापर्यंत 21 उमेदवार जाहीर केले असून त्यातील चार उमेदवार आयात आहेत. या उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाचा भगवा हातात घेतला.
माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता. ठाकरे यांनी त्यांना यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जाणारे पिंपरी चिंचवडमधील नेते संजोग वाघेरे पाटील यांना ठाकरे यांनी मावळचे तिकीट दिले आहे.
उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ज्या लोकसभा मतदारसंघावरून वाद आहे, अशा सांगलीमधून शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उभे केले आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा झाली होती. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्यासह ठाकरे गटात प्रवेश करणारे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना लगेच जळगावची उमेदवारी देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला तर आपल्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापून आयात उमेदवाराचा आधार घ्यावा लागला आहे. भाजपाच्या हट्टामुळे शिंदे यांना काँग्रेसचे उमरेडचे माजी आमदार राजू पारवे यांना पक्षात घेऊन तिकीट द्यावे लागले आहे. याशिवाय शिंदे यांच्यावर उमेदवार बदलासाठी दबाव असल्याने उत्तर पश्चिम मुंबईसह अन्य मतदारसंघात त्यांची भिस्त आयात उमेदवारावर असण्याची जास्त शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटालाही सक्षम उमेदवार म्हणून आयात उमेदवारांचा आधार घ्यावा लागत आहे. पक्षातील फुटीनंतर अजित पवार गटात गेलेल्या माजी आमदार नीलेश लंके यांना पवार गटाने अहमदनगरमधून तिकीट दिले आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाची फारशी ताकद नसल्याने राष्ट्रवादीला येथून काँग्रेसच्या माजी आमदार अमर काळे यांना पक्षात घेऊन उमेदवारी द्यावी लागली.
आता माढा आणि सातारा लोकसभा मतदारसंघातही शरद पवार यांच्याकडून योग्य उमेदवाराचा शोध सुरू असून हा उमेदवार अन्य पक्षाचा असू शकतो. कालपरवापर्यंत पक्षीय राजकारणापासून दूर राहिलेल्या श्रीमंत शाहू महाराज यांना काँग्रेसने कोल्हापूरमधून उमेदवारी दिली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने धाराशिवच्या उमेदवारीसाठी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना आयात केले आहे. तसेच शिंदे शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षात घेऊन शिरूरमध्ये उभे केले.
2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि त्यांच्या मुलांना पक्षात घेऊन लोकसभेची उमेदवारी देणाऱ्या भाजपने यंदा अमरावतीमधून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. आयात उमेदवारांना पायघड्या घालण्यात वंचित बहुजन आघाडीही मागे राहिलेली नाही. मनसेचा राजीनामा दिलेले वसंत मोरे यांना वंचितने पुण्यातून लोकसभेच्या मैदानात उतरविले आहे. विशेष म्हणजे वसंत मोरे यांनी वंचितमध्ये अधिकृत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली होती.
आयात उमेदवार :
शिवसेना उद्धव ठाकरे गट
1. संजय देशमुख (यवतमाळ वाशिम)
2. संजोग वाघेरे पाटील (मावळ)
3.चंद्रहार पाटील (सांगली)
4. करण पवार (जळगाव)
राष्ट्रवादी शरद पवार गट
1. नीलेश लंके (अहमदनगर)
2. अमर काळे (वर्धा)