‘लोहगाव में बम फटा…’; मुलाच्या मोबाइल गेममुळे पोलिसांची पळापळ

पुणे – पोलीस नियंत्रण कक्षाला रविवारी सकाळी एक कॉल आला. यामध्ये स्फोटसदृश्य आवाज आल्यानंतर समोरची व्यक्ती “लोहगाव मे बम फटा’ असे म्हणत होती. पोलीस अधिक माहिती घेईपर्यंत कॉल कट झाला होता. ही बाब गांभीर्याने घेत पोलीस पथके तातडीने माग काढत कॉल करणाऱ्यापर्यंत पोहचली. मात्र, तेथे पोहचल्यावर त्यांना एक वेगळेच दृश्य दिसले. तेथे एका सात वर्षांचा मुलगा मोबाइलवर खेळताना आढळला.
अधिक चौकशीत त्याने वडिलांचा मोबाइल खेळताना चुकून नियंत्रण कक्षास कॉल लागल्याचे समजले. पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे यांनी सांगितले, नियंत्रण कक्षाला कॉल आल्यावर विशेष शाखा आणि विमानतळ पोलिसांच्या पथकांनी शोधाशोध सुरू केली. त्यांना तांत्रिक तपासात कॉल लोहगाव येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून आल्याचे आढळले. लोहगाव परिसरात एअरपोर्ट आणि इतर संवेदनशील परिसर असल्याने प्रकरण गांभीर्याने घेण्यात आले होते.
याइमारती शेजारच्या लेबर कॅम्पमध्ये तपासणी केली असता, घरात एक सात वर्षांचा मुलगा आढळला. त्याचे आईवडिल कामावर गेले होते. मात्र त्याच्या हातात वडिलांचा फोन होता. त्या मुलाने वडिलांच्या फोनवर खेळताना चुकून पोलीस नियंत्रण कक्षास कॉल गेला. कॉल गेल्यावर घरातील काही भांडी जमिनीवर पडली. त्याचा आवाज नियंत्रण कक्षास आला होता. दरम्यान याप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवली गेली नाही. फक्त स्टेशन डायरीचा अहवाल तयार केला गेला.





