Pimpri : लोहगड एक जागतिक वारसा

पवनानगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, दुर्गसंस्कृतीचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक लोहगड किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. फ्रान्सच्या पॅरिस येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४७ व्या परिषदेत भारत सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास एकमताने मंजुरी देण्यात आली.
या यादीत महाराष्ट्रातील बारा शिवकालीन गडकिल्ल्यांचा समावेश असून, मावळ तालुक्यातील लोहगड किल्ला त्यापैकी एक आहे. या ऐतिहासिक घडामोडीमुळे तमाम शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि मावळवासीयांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. लोहगड किल्ला हा आता केवळ स्वर्णिम इतिहासाची साक्ष न राहता, जागतिक वारसा बनला आहे. यामुळे लोहगड आणि परिसराचा सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या वीर योद्धांच्या पदस्पर्शाने पावन झालेला लोहगड किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार बनून आजही उभा आहे. शेकडो वर्षांपासून ऊन-वारा पाऊस झेलत उभ्या असलेल्या लोहगडाने कैक पिढ्यांना शिवरायांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटनांची माहिती दिली आहे. अपि्रतम स्थापत्य कलेचे उदाहरण असलेला हा किल्ल्ा मावळ तालुक्याच्या सौंदर्याला शौर्याची किनारही देतो.
लोहगड व विसापूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून लोहगड-विसापूर विकास मंच गेली २५ वर्षे सातत्याने कार्यरत आहे. ‘‘संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड किल्ल्यांचे’’ या ब्रीदवाक्यानुसार या मंचाने लोहगडाच्या जतन आणि संवर्धनासाठी भरीव कामगिरी केली आहे. ग्रामस्थांच्या मदतीने गडावरील जीर्ण झालेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार, महाशिवरात्री यात्रेचे आयोजन, भारतीय पुरातत्व विभागाच्या सहकार्याने गणेश दरवाज्याची पुनर्बांधणी, दरवाजे बंद करण्याची ठोस व्यवस्था, तटबंदी, बुरुज आणि पायऱ्यांची दुरुस्ती अशा विविध कामांची पूर्तता झाली आहे. यामुळे गडावरील गैरप्रकारांना आळा बसला असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठीही व्यवस्था सुधारली आहे.
जगाच्या नकाशावर लोहगड
जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याने लोहगडचा कायापालट होणार आहे. यामुळे पर्यटनदृष्ट्या किल्ल्याला चालना मिळेल, स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच गड परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यात येतील. भारत सरकारने यासाठी २०२४-२५ साठी महाराष्ट्रातील नऊ गिरीदुर्ग आणि तीन जलदुर्ग यांचा प्रस्ताव युनेस्कोकडे सादर केला होता. यामध्ये लोहगडसह शिवनेरी, राजगड, रायगड, साल्हेर, खांदेरी, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या ऐतिहासिक गडांचा समावेश आहे.
शिवप्रेमींनी व्यक्त केला आनंद
या ऐतिहासिक निर्णयानंतर शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. आनंद व्यक्त करताना बजरंग दल संघटनेचे संदेश भेगडे म्हणाले, ‘‘हे यश केवळ केंद्र व राज्य शासनाचे नाही, तर गडसंवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येक शिवभक्त कार्यकर्त्याचे आहे. लोहगडसह इतर गडकोटांना मिळालेला जागतिक वारसा दर्जा हा शिवशौर्याचा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.’’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
इतिहासाचा साक्षीदार लोहगड
लोहगड हा अति मजबूत, बुलंद आणि मजबूत किल्ला आहे. भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या कालखंडात निर्माण झाल्या त्याच कालखंडात म्हणजे २००० वर्षांपूर्वी या लोहगड किल्ल्याची निर्मिती झाली असावी असा अंदाज आहे. सातवाहन, चालुक्य, यादवांसारख्या राजवटी या किल्ल्याने बघितल्या असून इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली होती. तेव्हा त्याने अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकी लोहगड हा देखील एक किल्ला होता.
इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम याला याच किल्ल्यावर कैद ठेवण्यात आले होते. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला शिवरायांना मुगलांच्या स्वाधीन करावा लागला होता. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला.
पहिल्या सुरत लुटीच्या वेळी आणलेली संपत्ती नेताजी पालकर यांनी लोहगडावरच आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी लोहगड कान्होजी आंग्रे यांस भेट म्हणून दिला. १७२० मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नाना फडणवीस यांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. पुढे १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ रोजी जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हूकुम सोडला. तेथून अनिच्छेनेच मराठे मागे फिरले.
किल्ल्यावरील महत्त्वपुर्ण वास्तू –
१. गणेश दरवाजा
याच दरवाजाच्या बुरुजाखाली सावळे कुटुंबाचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांच्या वंशजांना लोहगडवाडीची पाटीलकी देण्यात आली होती.
२. नारायण दरवाजा
हा दरवाजा नाना फडणवीसांनी बांधला. या ठिकाणी एक भुयार आहे, जिथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येत असत.
३. महादरवाजा
हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे. ह्या दरवाज्यांचे काम नाना फडणीसांनी १ नोव्हेंबर १७९० ते ११ जून १७९४ या कालावधीत केले.
४.लक्ष्मी कोठी
या कोठीत राहण्याची सोय होती. कोठीत अनेक खोल्या आहेत. दर्ग्याच्या पुढे थोडे उजवीकडे गेल्यास थोडा उंचवट्याचा भाग आहे. तेथे एक शिवमंदिर आहे.
५. सोळाकोनी तळे
ही गडावरील पिण्याच्या पाण्याची एकमेव सोय आहे. नाना फडणवीसांनी या तळ्याची बांधणी केली आहे. तळ्याच्या भिंतीवर एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा की, “शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली.” अशी माहिती सदर शिलालेखातून केली आहे.
जागतिक वारसा मिळाला पण आता पुढे काय?
आंतरराष्ट्रीय ओळख व पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
युनेस्कोच्या यादीत समावेशामुळे लोहगडची ओळख जगभर पोहोचेल.
मार्गदर्शक, हॉटेल, भोजनालय, वाहनचालक इत्यादींना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे, माहिती केंद्रे, सुरक्षाव्यवस्था यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता.
केंद्र व राज्य सरकारकडून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरून देखभाल व संवर्धनासाठी निधी मिळेल.
किल्ल्याच्या जतनासाठी वैज्ञानिक पद्धती वापरल्या जातील.
वारसा पर्यटनासोबत सांस्कृतिक पर्यटनही विकसित होईल.
इतिहास, पुरातत्व, वास्तुकला यांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना अभ्यासाची संधी.





