काबूल- तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी तो देश सोडून परांगदा झाले. हेलिकॉप्टरमध्ये रोकड भरून त्यांनी देशाबाहेर उड्डाण केले.
रशियन वृत्तसंस्थेने 72 वर्षीय घनी यांच्याविषयीची बातमी दिली. त्यासाठी काबूलमधील रशियन दूतावासाने दिलेल्या माहितीचा आधार घेण्यात आला.
घनी यांच्यासह चार कारचा ताफा हवाई तळावर पोहचला. त्या कारमध्ये रोकड भरण्यात आली होती. ती रोकड घनी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ठेवण्यात आली. आणखी एक मोठी बॅगही हेलिकॉप्टरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, जागेअभावी ते जमले नाही.
त्यामुळे पैशांनी भरलेली बॅग धावपट्टीवरच टाकून देण्यात आली. अफगाण सोडून घनी नेमके कुठे गेले ते तातडीने समजू शकले नाही. अर्थतज्ञ आणि शिक्षणतज्ञ असणाऱ्या घनी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये पहिल्यांदा अफगाणच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली.
त्यानंतर पाच वर्षांनी 2019 मध्ये त्यांची फेरनिवड झाली. मात्र, तालिबानने अफगाणचा ताबा घेतल्याने घनी यांना दुसरा कार्यकाळ अर्धवट सोडून परागंदा व्हावे लागले आहे.