Crime News : बंद घराचे कुलूप तोडून ४ लाख ८५ हजारांचा ऐवज लंपास
Crime News : घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा फोडून त्यातील तिजोरीचा कप्पाही तोडण्यात आला. त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून चोरटा पसार झाला.

शिरूर : शिरूर तालुक्यातील रामलिंग येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी कपाट फोडून तब्बल ४ लाख ८५ हजार ५० रुपयांचा सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून घरफोडीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
याप्रकरणी गंगाधर रामचंद्र भोसले (वय ६९, रा. रामलिंग, ता. शिरूर; सध्या मुंबई) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजल्यापासून २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत भोसले यांच्या रामलिंग येथील घराच्या दरवाजाचे कुलूप व कडी-कोंडा अज्ञात चोरट्याने तोडला. घरात प्रवेश केल्यानंतर बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा फोडून त्यातील तिजोरीचा कप्पाही तोडण्यात आला. त्यामधील सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून चोरटा पसार झाला.
चोरीस गेलेल्या ऐवजात सोन्याचे गंठण, मंगळसूत्रे, सात पुतळ्यांचे दागिने, कानातले, नथी तसेच चांदीचा पाळणा, चांदीच्या पादुका, चांदीचे गोळे आणि ३ हजार ६०० रुपये रोख यांचा समावेश आहे. या सर्व ऐवजाची एकूण किंमत ४ लाख ८५ हजार ५० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, घरफोडीची घटना समोर आल्यानंतर शिरूर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला आहे. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध दिशेने तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करीत आहेत.





