प्रभात वृत्तसेवा खेड शिवापूर – वेळू (ता. भोर) येथील महावितरणच्या वीज उपकेंद्राचे रखडलेले काम, अपुरा व विस्कळीत वीजपुरवठा यामुळे वेळू (ता.भोर) व खेड शिवापूर(ता. हवेली) विभागातील उद्योजक आणि स्थानिक नागरीक त्रस्त झाले आहेत. या त्रस्त नागरीक आणि उद्योजकांनी सोमवारी सकाळी वेळू येथील महावितरण कार्यालयाला घेराव घालून जाब विचारला. मात्र, या वीज उपकेंद्राचे काम नक्की कोठे अडकले आहे. याची खुद्द महावितरण अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळे उद्योजक आणि स्थानिक नागरिक अजूनच संतप्त झाले. वेळू आणि खेड शिवापूर परीसरात अनेक छोटे मोठे उद्योग आणि कंपन्या आहेत. मात्र, अनेक वर्षांपासून या भागात अपुरा आणि विस्कळीत वीज पुरवठ्याचा या उद्योगांना सामना करावा लागत आहे. त्यासाठी नवीन वीज उपकेंद्र प्रस्तावित आहे. त्यासाठी गेल्या दीड वर्षापूर्वी वेळू येथे ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अद्याप या उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दुसरीकडे विजेच्या समस्येला स्थानिक नागरिक आणि उद्योजकांना रोज सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभमीवर वेळू येथील स्वराज्याचे शिलेदार संघटना, या भागातील उद्योग व्यावसायिक आणि इतर ग्रामस्थांनी वेळू येथील महावितरण कार्यालयाला सोमवारी सकाळी घेराव घातला. यावेळी महावितरणच्या प्रस्तावित उपकेंद्राचे काम कुठे रखडले आहे, याबाबत विचारणा केली असता महावितरण अधिकाऱ्यांना त्याबाबत काहीही माहिती नसल्याचे दिसून आले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि महावितरणच्या शासकीय कंत्राटदार असोसिएशनचे योगेश घोरपडे यांनी सबंधित ठेकेदार आणि इतर महावितरण अधिकारी यांना फोन करून या उपकेंद्राच्या कामाची सद्यस्थिती उपस्थितांच्या निदर्शनास आणून दिल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान तत्पूर्वी स्वराज्याचे शिलेदार संघटना व उद्योजकांनी “आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्ची खाली करा” या घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून सोडला होता.या प्रसंगी कार्यकारी अभियंता देविदास बैकर, उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनचळे, वेळू कार्यालयाचे अभिजित भोसले, तसेच औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर, स्वराज्याचे शिलेदार संघटनेचे राहुल पांगारे, अजिंक्य पांगारे, गुलाब चौबे, शेखर पांगारे, ॲड. संतोष शिंदे तसेच भोरचे माजी उपसभापती अमोल पांगारे, भोर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष हिरामण पांगारे, उद्योजक जीवन धनावडे आदी उपस्थित होते.