Local Politics: निवडणूक निकालाच्या तोंडावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. चिपळूण तालुक्यातील कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले माजी उपशहरप्रमुख, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक तसेच शहरातील प्रभावी नेते समीर टाकळे यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यापुढे शिवसेना (ठाकरे गट) पक्षाशी आपला कोणताही संबंध राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. चिपळूण तालुक्यात ठाकरे गटाला सलग धक्के बसत असतानाच टाकळे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. टाकळे कुटुंब हे गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेशी निष्ठावंत राहिले असून, त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. समीर टाकळे यांनी आपल्या निवेदनात दीर्घकाळ पक्षासाठी काम केल्याचे नमूद करत, बदलत्या राजकीय परिस्थितीत हा निर्णय घेतल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, त्यांनी पुढील राजकीय भूमिका किंवा कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर केलेली नाही. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत ठेवण्यात टाकळे यांची महत्त्वाची भूमिका राहिली असून, त्यांच्या राजीनाम्याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. चिपळूण तालुक्यातील राजकारणात पुढील काळात कोणती नवी समीकरणे तयार होतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.