वेल्हे -राजगड किल्ल्यावरील रोप-वे संदर्भात काही शिवप्रेमी संघटनांनी विरोध दाखवला असताना गडावर रोप-वे हवा की नको, यासाठी स्थानिकांनी बैठकीचे आयोजन केले होते.
मात्र तालुक्यातील स्थानिक मावळे रोप-वेच्या समर्थनार्थ एक झाले. किल्ले राजगडासह किल्ले तोरणावरसुद्धा रोप-वे व्हावा, अशी मागणी एकमुखाने करत रोप-वेला पाठिंबा दर्शविला आहे.
लव्ही (ता. वेल्हे) येथील भैरवनाथ मंदिरात या बैठकीचे बुधवारी (दि. 7) आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक रेवणनाथ दारवटकर, भोर वेल्हे कृती समिती अध्यक्ष माऊली दारवटकर,
इतिहास संशोधक दत्ता नलावडे, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, शंकर भुरूक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष रेणुसे, आनंद देशमाने, गुलाब रसाळ, शंकर रेणुसे,
गणेश खुटवड, बाळाजी सणस, विकास नलावडे, शैलेश वालगुडे, पंचक्रोशीतील सरपंच, उपसरपंच आदींसह परिसरातील आणि तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी किल्ले राजगडावर रोप-वेला पाठिंबा देण्यासाठी वेल्हे पंचायत समितीच्या माध्यमातून ठराव दिला असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे यांनी दिली.
मेरावणे सरपंच सत्यवान रेणुसे, पाल बुद्रुकचे सरपंच गोरक्ष शिर्के, लव्हीचे उपसरपंच नंदू रसाळ, मेटपिलावरे सरपंच, वाजेघर सरपंच यांनी रोप-वे पाठिंबा ठराव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तयार केला असल्याचे सांगितले.
किल्ले राजगडवर हजारो पर्यटक येतात. या रोप-वेमुळे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. रोप-वे म्हणजे विकासाचा राजमार्ग आहे. वेल्हे तालुक्यातील जनतेसाठी पर्यटन हा एकच पर्याय व्यवसाय वृद्धीसाठी आहे. राजगडासह तोरणा किल्ल्यावरही रोप-वे झाला पाहिजे.
– रेवणनाथ दारवटकर, संचालक, पुणे जिल्हा बॅंक
किल्ले राजगडावर किल्ले रायगडच्या धर्तीवर राजगड विकास प्राधिकरण होण्यासाठी या किल्ले परिसरातील ग्रामपंचायतींचा ठराव होणे गरजेचे असून या माध्यमातून गडांचा व परिसराचा विकास होईल.
– दत्ता नलावडे, इतिहास संशोधक