पाच वर्षात महिलांकडून कर्ज घेण्यात तिपटीने वाढ

नवी दिल्ली – केंद्र सरकार महिला सबलीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. आर्थिक साक्षरता वाढण्यात आली आहे. त्याचबरोबर महिलांची बँक खाते वाढली आहेत. अशा परिस्थितीत महिलाकडून वैयक्तिक आणि व्यावसायिक उद्दिष्टासाठी घेतलेल्या कर्जाचे प्रमाण गेल्या पाच वर्षात तीन पटीने वाढल्याची माहिती नीती आयोग आणि ट्रान्स युनियन सिबिल य कंपनीने जारी केले आहे.
2019 पासून 2024 पर्यंत संकलित केलेल्या माहितीनुसार प्रत्येक वर्षाल कर्ज घेणार्या महिलांची संख्या दरवर्षाला 22 टक्क्याने वाढत आहे. कौटुंबिक उपयोगाबरोबरच आपल्या उद्योगधंद्यासाठी महिलांचे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत आहे. ही समाधानाची बाब असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कालावधीत महिलांनी घेतलेल्या सुवर्ण कर्जात 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जात सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
2019 मध्ये महिलांनी घेतलेल्या एकूण कर्जात वैयक्तिक कर्जाचे प्रमाण 39 टक्के होते. ते आता 2024 मध्ये 42 टक्क्यावर गेले आहे. महिलांना कर्जासाठी इतर तारण उपलब्ध असतानाही महिला प्रामुख्याने सोन्याचा कर्जासाठी जास्त प्रमाणात वापर करीत असल्याचेही आढळून आले आहे. 2019 मध्ये महिलांनी घेतलेल्या एकूण कर्जात सुवर्णकर्जाचे प्रमाण 19% होते ते 2024 मध्ये 36 टक्क्यावर गेले आहे.
नीमशहरी भागात जास्त कर्ज
ज्या महिलांनी कर्ज घेतले आहे त्या महिला मेट्रो शहरातील नाहीत तर छोट्या शहरातील आहेत. एकूण कर्जात या महिलांचे प्रमाण 60% इतके आहे. या महिला कपडे शिवणे, तंबाखूजन्य पदार्थ, ब्युटी पार्लर, प्रक्रिया आणि अन्न वितरण इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे छोटे मोठे व्यवसाय चालत आहेत. या कालावधीत व्यावसायिक महिलांनी 37 लाख नवी खाती उघडले आहेत. या खात्यातून 1.9 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे.





