सातारा -भारतीय स्टेट बॅंकेअंतर्गत एफआय आणि एमएम विभागाची स्थापना करण्यात आली आहे. हा विभाग ग्रामीण व निमशहरी भागातील आर्थिक सर्वसमावेशकता आणि लघु बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत या विभागाअंतर्गत बॅंकेतर्फे प्रामुख्याने शेती आणि पूरक उपक्रमांवर तसेच सूक्ष्म, लघु व्यवसायांसाठी कर्ज दिले जाणार आहे. लघु विभागाला खास सेवा देण्यासाठी ग्रामीण व निमशहरी भागातील सुमारे 8000 शाखांची निवड करण्यात आली असून या सेवांमध्ये लघुउद्योग आणि शेतकऱ्यांना मायक्रो क्रेडिट पुरवण्याचाही समावेश असेल. बॅंकेच्या ग्रामीण, निमशहरी, शहरी आणि महानगर भागातील तब्बल 63 हजार ग्राहक सेवा केंद्रांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे सेवेचा दर्जा आणि बॅंकिंग सेवांची उपलब्धता सुधारण्यावरही भर दिला जाणार आहे. या विभागाच्या लॉंच करताना बॅंकेचे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले, “”एसबीआय सर्व क्षेत्रांतील आपल्या ग्राहकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. एफआय आणि एमएम विभाग प्रामुख्याने वेगवेगळ्या व्यवसायांत अधिक चांगली सेवा देण्यासाठी आणि शाखांतील ग्राहकांबरोबरच्या संवादाचा दर्जा उंचावण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. आर्थिक सर्वसमावेशकतेचा एक भाग म्हणून देशाच्या ग्रामीण भागात राहाणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एसबीआयने सुरू केलेला हा एक महत्वाचा उपक्रम आहे. नव्या एफआय आणि एमएम विभागाद्वारे लघु उद्योग, शेती व पूरक व्यवसायांना आपला व्यवसाय सुरळीतपणे चालवता यावा. विशेषतः सध्याच्या कठीण परिस्थितीतही त्यांना यशस्वी होता यावे यासाठी सेवा देण्याची संधी दिली जाणार आहे. ” राष्ट्रीय पातळीवर एफआय आणि एमएम विभागाचे नेतृत्व डीएमडी संजीव नौटियाल करतील. स्थानिक पातळीवर खास लक्ष देण्यासाठी आणि सुरळीत कामकाज चालवण्यासाठी एफआय आणि एमएम विभागामध्ये चारस्तरीय रचना करण्यात आली आहे. मुख्य व्यवस्थापकाअंतर्गत, व्यवस्थापक, रिजनल बिझनेस ऑफिसेस आणि जिल्हा विक्री केंद्राची ही चारस्तरीय रचना पतवितरण यंत्रणा मजबूत करून लघुकर्जासाठी आवश्यक जलद मंजुरी व वितरण वेळेवर होईल याची खात्री करेल. जिल्हा स्तरावर एकत्रित प्रयत्न करण्यावर प्रमुख भर दिला जाणार असून त्यामुळे एफआय आणि एमएम नेटवर्कमधील शाखांना सातत्याने विक्री आणि वसुलीसंदर्भासाठी आवश्यक मदत मिळेल.